जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धेत शिवराज मालवी यांना ६ सुवर्ण पदकं

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
अॅक्वॅटिक असोसिएशन ऑफ चंद्रपूर जिल्हा यांच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा दिनांक २९ जून रोजी चंद्रपूर येथील डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स स्विमिंग पूल मध्ये पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यातून १०० हून अधिक जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
ब्रम्हपुरी येथून शिवराज मालवी यांच्या नेतृत्वाखाली १८ जलतरणपटूंनी सहभाग घेतला. सर्व जलतरणपटूंनी शिवराज मालवी यांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी करत एकूण ५० पदके व ट्रॉफी जिंकून ब्रम्हपुरीचे नाव पुन्हा एकदा जलतरण क्षेत्रात सर्वोच्च स्थानावर पोहचवले. त्यांच्या या कौतुकास्पद विजयाबद्दल ब्रम्हपुरीवासीयांनी सर्व जलतरणपटूंचे आणि शिवराज मालवी यांचे अभिनंदन केले.
या स्पर्धेतील विशेष लक्षवेधी बाब म्हणजे ६३ वर्षीय शिवराज मालवी यांनी स्वतः ६ सुवर्ण पदकं पटकावली आणि सोबतच्या युवा जलतरणपटूंना प्रोत्साहन देत त्यांच्या आत्मविश्वासात भर घातली. त्यांनी स्वत: ५० मीटर, १०० मीटर, २०० मीटर फ्री स्टाईल, ५० मीटर व १०० मीटर बॅकस्ट्रोक, तसेच ५० मीटर ब्रेस्टस्ट्रोक स्पर्धांमध्ये यश संपादन केले.
या अद्वितीय यशामुळे ब्रम्हपुरीचे नाव जिल्हास्तरावर पुन्हा गौरवाने उजळले आहे.