ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बिबी ग्रामपंचायतीत स्वच्छता व कचरा व्यवस्थापनाची प्रशंसनीय कामगिरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 हागणदारी मुक्त अधिक उत्कृष्ट ग्रामपंचायत उपक्रमांतर्गत अंतर तालुका तपासणी अंतर्गत बिबी ग्रामपंचायतीची पाहणी करण्यात आली. यासाठी पंचायत समिती बल्लारपूर व कोरपना येथील अधिकारी व समन्वयकांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामांची तपासणी केली.

तपासणी पथकात गटविकास अधिकारी धनंजय साळवे, विस्तार अधिकारी दिलीप बैलनवार, गट समन्वयक सुनील नुतलवार (बल्लारपूर), गटविकास अधिकारी विजय पेंदाम, विस्तार अधिकारी पंढरीनाथ गेडाम, विस्तार अधिकारी दादाराव पवार, गट समन्वयक लॉरेन्स खोब्रागडे व सांडपाणी व घनकचरा सल्लागार विठ्ठल अहिरकर यांचा समावेश होता.

या पाहणीत शोष खड्डे, नाडेप कंपोस्ट युनिट्स, खत खड्डे, कचराकुंड्या, सार्वजनिक स्वच्छता संकुल तसेच ओला-सुका कचरा वर्गीकरण व अपशिष्ट व्यवस्थापन यांची सविस्तर पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायतीकडून ही कामे नियोजनबद्ध व गुणवत्तापूर्ण झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.

ग्रामस्थांचा सहभाग, स्वच्छतेबद्दलची जनजागृती तसेच महिलांचे व युवकांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे पाहणी अहवालात नमूद करण्यात आले. अधिकाऱ्यांनी या उपक्रमांची नियमित देखरेख व अधिक जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या. यावेळी सरपंच माधुरी टेकाम, उपसरपंच आशिष देरकर, ग्रामपंचायत अधिकारी धनराज डुकरे, सुनील कुरसंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

बिबी ग्रामपंचायत ही हागणदारी मुक्त अधिक उत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याचे या तपासणीतून स्पष्ट झाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये