शेतकऱ्यांच्या हितासाठी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा आवश्यक _ आमदार सुधीर मुनगंटीवार यांची विधानसभेत मागणी
सोलर पंप उपयुक्त ; मात्र गरजेनुसार एजी पंपही द्यावेत मुख्यमंत्र्यांच्या दालनात उच्चस्तरीय बैठक घेण्याचे राज्यमंत्र्यांचे आश्वासन

चांदा ब्लास्ट
मुंबई : शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधताना राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी सोलर कृषीपंप धोरणात सुधारणा करण्याची गरज अधोरेखित केली. विविध भागातील भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, शेतकऱ्यांच्या गरजेनुसार एजी पंप देण्याची मागणी विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आ. श्री. मुनगंटीवार यांनी राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडे केली.
आ. श्री. मुनगंटीवार यांनी सीआरआय कंपनीच्या सोलर पंपांबाबत आलेल्या तक्रारी, प्रलंबित प्रकरणे व दुरुस्तीच्या विलंबाकडे विधानसभेत लक्ष वेधले. “सोलर पंप उपयुक्त आहेत, मात्र जेथे सोलर पंप काम करत नाहीत, तेथे एजी पंप द्यावेत,’ अशी मागणी त्यांनी रेटून धरली.
या चर्चेला उत्तर देताना महाराष्ट्राच्या ऊर्जा राज्यमंत्री सौ. मेघना बोर्डीकर यांनी सोलर पंपांच्या सबसिडी व कार्यक्षमता बाबत माहिती दिली. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दालनात लवकरच उच्चस्तरीय बैठक घेण्याचे आश्वासन दिले.
शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे
आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार हे नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. याआधी त्यांच्या पुढाकारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विक्रमी २०२ कोटी रुपयांचा पीक विमा मिळवून देण्यात आला होता. अलीकडेच २० हजार हेक्टर प्रमाणे प्रत्येकी दोन हेक्टर धानाच्या बोनससंदर्भातील त्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. ९३ कोटी रुपयांचा बोनस जिल्ह्यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत त्यांची संवेदनशीलता, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि लढण्याची तयारी हेच त्यांच्या कार्यशैलीचे खरे वैशिष्ट्य आहे.