ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रद्धेय गुरुचरणजी मर्दाने यांच्या जयंतीनिमित्त वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच, राजुरा

प्रतिभावंत इतिहास अभ्यासक, समाजसेवक तथा कर्तव्यदक्ष सेवानिवृत्त अधिकारी श्रद्धेय गुरुचरणजी मर्दाने यांच्या ९७ व्या जयंतीनिमित्त जय हिंद सैनिक संस्था, राष्ट्रीय सामाजिक न्याय कृती मंच, डॉ. आंबेडकर – वाल्मिकी वेल्फेअर सोसायटी, आर्यावर्त पोलीस मित्र सुरक्षा परिषद ऑफ इंडिया, पत्रकार सुरक्षा समिती, ओशनिक बहुउद्देशीय संस्था, वरोरा – भद्रावती – चंद्रपूर रेल्वे प्रवासी संघ, आनंदवन मित्र मंडळ, वरोरा; आनंदम् मैत्री संघ,वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण कार्यक्रम स्थानिक खांजी वार्डातील, पवनसूत देवस्थान परिसरात उत्साहात पार पडला.

 कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वरोरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रफुल्ल खुजे हे होते. कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष बंडू देऊळकर, आनंदम् मैत्री संघाचे वरोरा समन्वयक भास्कर गोल्हर, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे पदाधिकारी राहुल देवडे, आनंदवन मित्र मंडळाचे अध्यक्ष डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रकाश पोहाणे, सामाजिक कार्यकर्ता राजेंद्र मर्दाने तसेच इतर मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. खुजे यांनी आपल्या मनोगतात वृक्षारोपणाचे पर्यावरणीय, सामाजिक व आरोग्यदायी महत्त्व विशद केले. श्रद्धेय गुरुचरणजी मर्दाने हे निर्व्यसनी, कर्तव्यदक्ष व अत्यंत स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी तर होतेच शिवाय त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा आदर्श आणि वंचित समाजासाठीचे योगदान पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत अन्य मान्यवरांनी व्यक्त केले.

     सुरुवातीला मान्यवरांनी दीप प्रज्वलन व श्रद्धेय गुरुचरणजी मर्दाने यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अभिवादन केले. तत्पूर्वी देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविले गेले .

       यावेळी मान्यवरांसह गजानन उमरे, भरत पातालबंसी, खेमचंद नेरकर, तुषार मर्दाने, कैलास चव्हाण, राजू बेलेकर, मोबीन पठाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात विविध संघटनेचे पदाधिकारी, नागरिक, युवक, मोठ्या संख्येने सहभागी झाले आणि त्यांनी उत्साहाने वृक्षारोपण केले.

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल देवडे यांनी केले तर आभार राजेंद्र मर्दाने यांनी मानले.

     या स्तुत्य उपक्रमामुळे पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलले गेले असून श्रद्धेय गुरुचरणजी मर्दाने यांच्या जयंतीने समाज हित साधल्या गेल्याचे मत सुजाण नागरिकांकडून व्यक्त करण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये