ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोंभूर्णा एमआयडीसीच्या निर्माणाचा मार्ग मोकळा!

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मागणीला यश!

चांदा ब्लास्ट

उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी सभागृहात दिले आश्वासन !
१०२ हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाला मान्यता, उर्वरित प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण होणार ; उद्योग विभागानी केले आश्वस्त

मुंबई, ३ जुलै : राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा येथे एमआयडीसी होण्यासाठी २००९ पासून सातत्याने पाठपुरावा केला. पंधरा वर्षांच्या या संघर्षाला अखेर यश आले आहे. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उद्योग राज्यमंत्री इंद्रनीलजी नाईक यांनी पोंभूर्णा एमआयडीसी वर्षभरात सुरू करण्याचे स्पष्ट आश्वासन आ. मुनगंटीवार यांना दिले.

या मुद्द्यावर अर्धा तास झालेल्या चर्चेत आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी  आतापर्यंतच्या पाठपुराव्याची आठवण करून दिली. एनओसी, नकाशा, नाहरकत प्रमाणपत्र, बैठकांचे इतिवृत्त आणि कालबाह्य प्रक्रियांमुळे हा प्रकल्प कसा लांबणीवर पडला, हे त्यांनी तपशीलवार मांडले. यावेळी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्री महोदयांकडे चार ठोस मागण्या करत लक्ष वेधले. संबंधित अधिकाऱ्यांची एक बैठक तत्काळ घेणे, चंद्रपूर जिल्ह्यातच राज्य उद्योग मित्र नेमावा, मंत्री महोदयांनी चंद्रपूर दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करावी, शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मोबदल्यात वाढ करावी, या मागण्यांचा यामध्ये समावेश होता.

उद्योग राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी सकारात्मक भूमिका घेत पोंभूर्णा एमआयडीसीसाठी १०२.५० हेक्टर भूसंपादन प्रस्तावाला मान्यता मिळाल्याची माहिती दिली. या अंतर्गत ४२.५९ हेक्टर शेतकऱ्यांशी थेट खरेदी करून २ कोटी ३५ लाखांचा मोबदला दिला गेला आहे. उर्वरित जमिनींसाठी ३३/३ ची नोटीस जारी करण्यात आली आहे.

आ.सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या मागण्याबाबत मंत्री नाईक म्हणाले, ‘यासंदर्भात अधिवेशन कालावधीतच बैठक आयोजित केली जाईल. चंद्रपूर येथे राज्य उद्योग मित्र नेमण्यात येईल. उर्वरित भूसंपादन प्रक्रिया ६० दिवसांत पूर्ण केली जाईल आणि अधिकाऱ्यांकडून दर आठवड्याला प्रगती अहवाल आमदार श्री. मुनगंटीवार यांना सादर केला जाईल. जमिनीच्या दरांसंदर्भात लवकरच बैठक घेण्यात येईल.’ यासोबतच पुढील महीन्यात मी स्वतः चंद्रपुरात  येतो, असे आश्वासनही राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी यावेळी दिले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये