आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय सेवेबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद
मा.सां. कन्नमवार शास. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम

चांदा ब्लास्ट
मेळघाट (जिल्हा अमरावती) येथील आदिवासी समुदायासाठी गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या ‘महान’ या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांनी कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, शरीर रचना (ॲनाटोमी) विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती मामीडवार, न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. शरद कुचेवार, जीव रसायनशास्त्र (बायो केमिस्ट्री ) विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती पापुलवार, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉ. हुमणे उपस्थित होते.
डॉ. सातव यांनी मेळघाट परिसरातील आरोग्य विषयक अडचणी, स्थानिक जनतेची आव्हाने व त्यांच्या ‘महान’ संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या आरोग्य सेवा कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी केलेल्या विशेष वैद्यकीय अभ्यासावर आधारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांची माहिती देखील दिली. येत्या डिसेंबर महिन्यात मेळघाट परिसरात आयोजित होणाऱ्या आरोग्य परिषदेसाठी येथील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा ठरला. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली.