गुजरी व आठवडी बाजार शुल्क निर्धारण जाहीर
नगर परिषद घुग्घुसने २०२५-२६ साठी नविन दरपत्रक जारी केले

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : नगर परिषद घुग्घुसने आर्थिक वर्ष २०२५-२०२६ साठी गुजरी व आठवडी बाजारासाठी शुल्कांचे नवीन दरपत्रक प्रसिद्ध केले आहे. या दरपत्रकात विविध प्रकारच्या दुकान, फड, गाड्या, हातगाड्या व व्यवसायिक ठेल्यांसाठी शुल्क निश्चित करण्यात आले असून, व्यवसायाच्या स्वरूपानुसार वेगवेगळ्या श्रेणींमध्ये त्याचे वर्गीकरण करण्यात आले आहे. हे शुल्क ₹१० ते ₹६० दरम्यान ठेवण्यात आले आहेत.
लहान व्यापाऱ्यांना दिलासा देण्यासाठी काही विशिष्ट व्यवसायांवर सवलती देण्यात आल्या आहेत. यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांना प्रोत्साहन मिळेल व बाजारपेठ अधिक शिस्तबद्ध पद्धतीने चालेल, असा उद्देश नगर परिषदेचा आहे.
महत्त्वाचे निर्देश :
नगर परिषद घुग्घुसने स्पष्टपणे सांगितले आहे की, परिषदेची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय कोणतेही वाहन बाजार परिसरात प्रवेश करू शकणार नाही. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.
ठेकेदारांवर नजर :
अधिकाऱ्यांच्या मते, ठेकेदारांमार्फत जर निश्चित दरापेक्षा अधिक शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल. व्यापाऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये, यासाठी पारदर्शकता राखणे अत्यावश्यक आहे.
नगर परिषद घुग्घुसने सर्व व्यापाऱ्यांना, विक्रेत्यांना आणि नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी निश्चित केलेल्या शुल्कांचे काटेकोरपणे पालन करावे व बाजारात सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करावे.
— नगर परिषद, घुग्घुस
(मुद्रांकित व स्वाक्षरीत आदेश प्रति संलग्न)