ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गणित आणि भाषा विषय शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे नुकसान

जिवतीत शिक्षण संकट ; पालक आंदोलनाच्या पवित्र्यात 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे

जिवती :- केंद्र सरकारने आकांक्षित तालुका म्हणून घोषित केलेल्या जिवती तालुक्याच्या शिक्षण क्षेत्रात गंभीर संकट निर्माण झाले आहे. या तालुक्यात शंभर टक्के शिक्षकांच्या जागा भरणे अनिवार्य असताना, मागील वर्षी तब्बल १६ उच्च प्राथमिक शाळांमधील गणित आणि भाषा विषयांच्या शिक्षकांना प्रतिनियुक्तीवर इतर तालुक्यांमध्ये हलविण्यात आले. यामुळे तालुक्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असून, गणित आणि भाषा या महत्त्वाच्या विषयांचे ज्ञान मिळवण्यापासून विद्यार्थी वंचित राहत आहेत. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून, शिक्षण विभाग जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही केला जात आहे.

             जिवती तालुका हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागासलेला भाग आहे. केंद्र सरकारच्या आकांक्षित तालुका योजनेअंतर्गत या भागातील शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला प्राधान्य देण्यात आले आहे. याच योजनेंतर्गत तालुक्यातील शाळांमध्ये शिक्षकांच्या सर्व जागा भरणे बंधनकारक आहे. मात्र, गतवर्षी शिक्षण विभागाने १६ गणित आणि भाषा विषयांच्या शिक्षकांना इतर तालुक्यांमध्ये प्रतिनियुक्तीवर पाठवले. यामुळे तालुक्यातील अनेक शाळांमध्ये या विषयांचे अध्यापन ठप्प झाले आहे. परिणामी, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून, यंदाच्या शैक्षणिक वर्षातही हीच परिस्थिती कायम राहण्याची भीती पालकांमध्ये आहे.

या गंभीर समस्येकडे शिक्षण विभागाचे लक्ष वेधण्यासाठी तालुक्यातील विविध शाळांमधील पालकांनी वारंवार निवेदने दिली. मात्र, शिक्षण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. मुलांना गणित आणि भाषा विषयांचे शिक्षण मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या विषयांशिवाय त्यांचे पुढील शिक्षण आणि भविष्य धोक्यात आहे. शिक्षण विभाग जाणीवपूर्वक मुलांच्या भविष्याशी खेळत असल्याच्या प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केल्या आहेत. गतवर्षीच्या सत्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्याने यंदाही त्याची पुनरावृत्ती होण्याची भीती पालकांना सतावत आहे.

जिवती तालुक्यातील कुंभेझरी, टेकामांडवा,चिखली खु, हिमायतनगर,शेणगाव,जिवती,सेवादासनगर सह १६ शाळांमध्ये गणित आणि भाषा विषयांचे शिक्षक उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणापासून वंचित राहावे लागत आहे. शिक्षण विभागाने या शिक्षकांना प्रतीनियुक्तीवर का पाठवले? त्यांच्या जागी नवीन शिक्षकांची नियुक्ती का केली नाही? यासारखे अनेक प्रश्न पालक आणि स्थानिक नागरिक उपस्थित करत आहेत.

शिक्षण विभागाच्या या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येत असल्याची भावना व्यक्त होत आहे.आकांक्षित तालुका योजनेचा मुख्य उद्देश हा मागास भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देणे हा आहे. मात्र, शिक्षकांच्या कमतरतेमुळे हा उद्देशच धोक्यात आला आहे. “आमच्या मुलांना गणित आणि भाषेचे ज्ञान मिळाले नाही, तर ते स्पर्धात्मक युगात कसे टिकणार? सरकार आणि शिक्षण विभागाने याकडे तातडीने लक्ष द्यावे,” अशी मागणी पालकांनी केली आहे. व ज्या शिक्षकांना शिक्षण विभागाने इतर तालुक्यामध्ये प्रतिनियुकीवर पाठवले आहे.

त्या शिक्षकांना परत आणावे अन्यथा त्या ठिकाणी नवीन शिक्षकांची नियुक्ती करावी असे न केल्यास संबंधित शाळांना टाळे ठोकून विद्यार्थ्यांना जिवती येथे आणून गटशिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन छेडणार असा इशारा पालकांनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये