श्रीधरराव गोडे यांचा वाढदिवस, वसंतराव नाईक जयंती व प्रा. विलास भोयर यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर
ग्रामीण शिक्षण प्रसारक मंडळ कोरपना द्वारा संचालित वसंतराव नाईक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय कोरपना येथे दिनांक १ जुलै २०२५ रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष श्रीधरराव गोडे यांच्या ८४ व्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा, प्रा. विलास भोयर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ तसेच स्व. वसंतराव नाईक जयंती उत्सव साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाला संस्थेचे सर्व पदाधिकारी, संचालक मंडळ, मुख्याध्यापक व प्राचार्य, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि निमंत्रित मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. अध्यक्ष श्रीधरराव गोडे यांचा विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीने शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व नोटबुकचे वाटप करण्यात आले, तसेच परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण पूरक उपक्रम राबविण्यात आला.
प्रा. विलास भोयर सर यांच्या सेवानिवृत्ती निमित्त संस्थेच्या वतीने अध्यक्ष श्रीधर गोडे, सचिव भाऊराव कारेकर व संचालक मंडळाने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. पुढील जीवनप्रवासासाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
संपूर्ण कार्यक्रम शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सक्रिय सहभागातून यशस्वीपणे पार पडला.