निमणी–वरोडा रस्त्याचे काम निकृष्ट; ग्रामस्थ संतप्त
मुरुमाऐवजी माती व कमी दर्जाची गिट्टी, ; ना पाणी ना रोड रोलर — चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना व राजुरा तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या निमणी व वरोडा या दोन गावांना जोडणाऱ्या दीड किलोमीटर खडीकरण रस्त्याचे काम सध्या अत्यंत निकृष्ट दर्जाचे सुरू आहे. या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून 81 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात मुरुमाऐवजी काळी माती व कमी दर्जाची गिट्टी वापरून नियमबाह्य काम केले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, रस्त्याच्या मजबुतीसाठी आवश्यक असलेली पाणी फवारणी, रोड रोलर आणि कॉम्पॅक्शन प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे तयार होत असलेला रस्ता टिकाऊ न राहता पावसातच खराब होण्याची शक्यता आहे.
संबंधित अभियंते कामाच्या ठिकाणी नियमित हजर नसल्याने ठेकेदारांची मनमानी सुरू असल्याचे ग्रामस्थ सांगतात.एवढेच नव्हे तर रस्त्याच्या दुतर्फा असलेली माती थेट रस्त्यावर टाकून खडीकरण करण्याचा प्रकार सुरू आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे कठीण झाले असून बैलगाड्या व वाहनांची ये-जा अडथळाग्रस्त झाली आहे.
या रस्त्याचा स्वतंत्र अधिकृत नकाशा असतानाही, कुठे 8 ते 9 मीटर तर कुठे 12 ते 15 मीटर अशा विस्कळीत रुंदीने काम सुरू आहे. यामुळे भविष्यात अपघाताचा धोका वाढण्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना जिल्हा परिषद बांधकाम विभाग, चंद्रपूर येथील कनिष्ठ अभियंता ओंकार अदनकर यांनी सांगितले की,
“माझ्या गैरहजेरीत कंत्राटदाराने मुरुमाऐवजी काळी माती वापरली होती. याबाबत त्याला सूचना देण्यात आल्या असून पुढील काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार पद्धतीने होईल.”
मात्र ग्रामस्थांचे म्हणणे आहे की फक्त सूचना देणे पुरेसे नसून या कामाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.



