जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा : कॉम्रेड रवींद्र उमाटे
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रेवार्षिक अधिवेशन संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
नुकतेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे त्रेवार्षिक तालुका स्तरीय एक दिवसीय अधिवेशन शहिद हुतात्मा स्मारक भद्रावती येथे कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.
सर्व प्रथम कॉम्रेड कार्ल मार्क्स, कॉम्रेड लेनिन, कॉम्रेड एंगेल्स यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले.
या वेळी मंचावर उपस्थितीत प्रमुख पाहुणे म्हणून कॉम्रेड रवींद्र उमाटे राज्य कार्यकारणी सदस्य चंद्रपूर, कॉम्रेड प्रकाश रेड्डी जिल्हा सचिव चंद्रपूर, कॉम्रेड राजू गैनवार माजी नगरसेवक व जिल्हा सहसचिव, कॉम्रेड अरविंद कुमार कॅप्टन जिल्हा कार्यकारणी सदस्य, कॉम्रेड छाया मोहितकर भद्रावती, कॉम्रेड फरजाना शेख भद्रावती इत्यादी मंच्यावर उपस्थित होते.
अधिवेशन उदघाटक प्रसंगी कॉम्रेड रवींद्र उमाटे म्हणाले की जाती धर्माच्या नावाने राजकारण करणाऱ्यानां धडा शिकवा, शेतकरी शेतमजूर, असंघटित कामगार, औद्योगिक कामगार व समाजातील सर्वच घटकांचे जीवन मरणाचे प्रश्न तीव्र झाले असून त्यांच्या मूलभूत प्रश्नाकडे लक्ष देणे ऐवजी जाती धर्माच्या नावाने सत्ताधारी व अत्ताधारी वर्ग श्रमिका मध्ये उभा करण्याचे काम करत असल्याचे यावेळी ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करतांना कॉम्रेड राजू गैनवार म्हणाले की शेतकऱ्यांना कर्ज माफी द्यायची तर मग समिती स्थापना कशाला! उद्योगपतींची कर्जमाफी करतांना कोणतीही समिती सरकार स्थापन करत नाही मग शेतकऱ्यांच्या कर्ज माफी साठी समिती कशाला उद्योगपतीचे कर्ज माफ होते मग शेतकऱ्यांची कर्ज माफ का होत नाही असा सवाल सरकारला केला आहे.
प्रमुख अतिथी म्हणून कॉम्रेड प्रकाश रेड्डी म्हणाले की कामगार कष्टकऱ्यांनी व शेतकऱ्यानीं आपल्या हिताचे सरकार स्थापन करून आपल्या हिताचे धोरण राबविले तरच न्याय मिळेल अन्यथा हे जनविरोधी – कामगार विरोधी – किसान विरोधी सरकार आपल्यावर अन्यायच करीत राहील असे ते म्हणाले.
गेल्या तीन वर्षाच्या कामकाजाचा अहवाल तालुका सहसचिव कॉम्रेड नितीन कावटी यांनी मांडला त्यावर उपस्थित प्रतिनिधीनीं चर्चा करून अहवाल मंजूर करण्यात आला
तालुका अधिवेशनात योजना कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करा, जान सुरक्षा विधेयकला विरोध करा, जनतेला लुटणारी स्मार्ट प्रिपेड वीज मिटर लावण्यात येऊ नये असे अनेक ठराव यावेळी करण्यात आले.
या मध्ये कॉम्रेड राजू गैनवार यांची भारतीय कम्युनिस्ट पक्ष तालुका सचिव म्हणून निवड करण्यात आली असून जिल्हा अधिवेशन चंद्रपूर येथे आयोजित केले आहे. या मध्ये दहा प्रतिनिधी सहभागी होणार आहे
या अधिवेशन करिता तालुक्यातून चाळीस पक्ष सभासद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संचालन कॉम्रेड लता देवगडे यांनी केले तर प्रास्ताविक कॉम्रेड बंडू डोंगे व अधिवेशनातील प्रमुख पाहुण्यांचे आणि अध्यक्षांचे तसेच सर्व उपस्थितांचे आभार कॉम्रेड शेख शकील यांनी मानले.