ध्येयनिश्चिती,प्रामाणिकपणा आणि अभ्यासातील सातत्याने यशप्राप्ती – प्राचार्य डॉ. वारकड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- कोणत्याही परीक्षेत अपयश आल्यास निराश होऊ नका प्लॅन बी तयार ठेवून त्यासाठी प्रयत्न करा, अभ्यास केला आणि लगेचच यश मिळाले पाहिजे असे नव्हे तर सतत नऊ वेळा परीक्षा नापास होणारा भारत आंधळे हा युपीएससी सारखी परीक्षा पास होतो. त्याच्यापासून प्रेरणा घ्या.
ध्येयनिश्चिती,प्रामाणिकपणा आणि अभ्यासातील सातत्याने हमखास यशप्राप्ती होते. देशाला उज्वल बनवण्याकरिता चांगल्या अधिकाऱ्यांची नितांत गरज आहे प्रामाणिक निष्ठावान अजय डोबल यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळेच देश उतुंग भरारी घेऊ शकतो.
ही अपेक्षा विद्यार्थ्याकडून असल्याने दैनंदिन घडामोडी बरोबरच सामाजिक, राजकीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय घडामोडीकडे गांभीर्याने लक्ष देत स्वतःला अपडेट ठेवण्याचे आवाहन श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील प्राचार्य तथा गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली व्यवस्थापन मंडळाचे सदस्य डॉ.वारकड यांनी केले.प्रेरणा प्रशासकीय सेवा महाविद्यालय गडचांदूर आयोजित युवा संवाद कार्यक्रमांतर्गत स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.यावेळी युगचेतना बहुद्देशीय ग्रामविकास संस्थेचे डॉ. राजकुमार मुसने, महाविद्यालयाचे प्राचार्य नानेश्वर धोटे,अरविंद मुसने, प्रा.स्वीटी डोंगे, प्रा. तिराणिक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य वारकड यांनी स्पर्धा परीक्षा, अभ्यासक्रम, योग्य संदर्भ ग्रंथांचे गांभीर्याने वाचन, वेळेचे नियोजन व कष्टाची फुल्ल तयारी गरजेचे असल्याचे सांगितले.स्पर्धा परीक्षांमुळे जीवनाकडे बघण्याचा चांगला आणि सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो.परीक्षांमध्ये अपयश आले तरी विद्यार्थ्यांनी खच्चून न जाता जोमाने प्रयत्न करायला हवा, डॉ. राजकुमार मुसने यांनी विद्यार्थ्यांना फक्त यश हवे आहे पण त्यासाठी कठोर साधना करण्यात मात्र कुचराही करतात.खऱ्या अर्थाने कष्टाची पूर्ण तयारी असल्याशिवाय यश कसे मिळेल, यासाठी विद्यार्थ्यांना प्रचंड परिश्रम घेऊन अपेक्षापूर्तीसाठी संघर्षरत राहण्याचा सल्ला दिला.
प्रास्ताविकातून प्राचार्य नानेश्वर धोटे यांनी महाविद्यालयाद्वारे स्पर्धा परीक्षेसाठी राबविण्यात येणाऱ्या अनेक उपक्रमाबाबत विद्यार्थ्यांना माहिती देऊन त्याचा लाभ घेण्याचे आवहान केले.कार्यक्रमाचे संचालन कु. प्रिया डवरे हिने तर आभार गणेश साळुंके याने मानले.