महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालयात MHT-CET CBT आधारित मॉक टेस्ट संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
– महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय, गडचांदूर यांच्या विद्यमाने आणि गडचांदुर शिक्षण प्रसारक मंडळ, गडचांदूर यांच्या मार्गदर्शनाखाली MHT-CET परीक्षेच्या अनुषंगाने CBT (Computer Based Test) आधारित मॉक टेस्ट आयोजित करण्यात आली. ही परीक्षा स्थानिक कॉम्प्युटर सेंटरवर पार पडली.
इंजिनियरिंग व पॅरामेडिकल क्षेत्रातील प्रवेशासाठी घेतली जाणारी ही परीक्षा अत्यंत महत्त्वाची व स्पर्धात्मक असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची पूर्वतयारी करता यावी, तसेच ऑनलाईन पद्धतीची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी यासाठी या मॉक टेस्टचे आयोजन करण्यात आले.
या मॉक टेस्टमध्ये एकूण 24 विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षेचा अनुभव, प्रश्नांचा अंदाज, वेळेचे व्यवस्थापन आणि संगणक हाताळणीची सवय होण्यासाठी ही चाचणी उपयुक्त ठरली.
या उपक्रमासाठी साई कॉम्प्युटरचे संचालक श्री. सतिश सातपुते आणि मल्टिपॉइंट कॉम्प्युटर एज्युकेशनचे संचालक श्री. मारोती नागपुरे यांनी कॉम्प्युटर व नेटवर्क सेवा उपलब्ध करून दिली. त्यांच्या सहकार्यामुळे परीक्षा सुरळीत व यशस्वीरीत्या पार पडली.
कार्यक्रमाच्या आयोजनात श्री. प्रशांत ताजने आणि श्री. नितीन वाढई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य व उपप्राचार्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक केले आणि सहभागी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना आगामी परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.