घुग्घुसमध्ये उडणाऱ्या धुळीचा सवाल ; प्रशासन कधी देणार उत्तर?
चांदा ब्लास्ट
गडचांदूरमध्ये माणिकगड सिमेंट कंपनी रस्त्यांची स्वच्छता राखण्यासाठी यंत्रांचा वापर करत आहे, पण घुग्घुसमध्ये मात्र असे कोणतेही प्रयत्न दिसून येत नाहीत. येथील रस्त्यांवरील धूळ आणि प्रदूषण ही गंभीर समस्या बनली आहे. एकेकाळी नागरिकांच्या आरोग्याचा आणि रस्ते सुरक्षेचा विचार करून नियमित स्वच्छता केली जात होती, तसेच पाण्याचा फवाराही केला जात होता. मात्र आता ही जबाबदारी केवळ कागदांपुरतीच मर्यादित राहिली आहे, प्रत्यक्षात मात्र परिस्थिती भलतीच बिकट झाली आहे.
ट्रान्सपोर्टिंग आणि प्रदूषणाचा विळखा
फोर लाइन वरील घुग्घुस-वणी मार्गावर मोठ्या प्रमाणात WCL चे कोळसा वाहतूक होते. कोळशाने भरलेले ट्रक, कचऱ्याची वाहतूक करणारी वाहने, तसेच सिमेंट आणि आयर्नच्या ट्रान्सपोर्टमुळे उडणारी धूळ रस्त्यावर प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी डोकेदुखी बनली आहे. अनेकदा माध्यमांनी हा मुद्दा अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण अद्याप कोणतेही ठोस पाऊल उचलले गेलेले नाही.
प्रशासन आणि संबंधित विभागांची निष्क्रियता
स्थानिक नागरिकांच्या चर्चेनुसार, पोलीस, प्रदूषण नियंत्रण विभाग, तहसीलदार, मुख्याधिकारी आणि अन्य संबंधित अधिकाऱ्यांची उदासीनता या समस्येला आणखी गडद करत आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात एखादा अधिकारी अडकला की त्यानंतरच काहीतरी सुधारणा होईल, अशी लोकांमध्ये भावना निर्माण झाली आहे.
घुग्घुसच्या जनतेला उपाय मिळणार का?
प्रश्न असा आहे की, जेव्हा गडचांदूरमध्ये कंपन्या रस्त्यांची स्वच्छता करू शकतात, तर घुग्घुसमध्ये का नाही? येथील कंपन्या आणि प्रशासन जबाबदारी टाळत आहेत का? नागरिकांच्या आरोग्याची कुणाला चिंता आहे का? जर लवकरच कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, तर हे प्रदूषण अधिक गंभीर स्वरूप धारण करू शकते. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे, अन्यथा याचा मोठा फटका सामान्य नागरिकांना बसू शकतो.