महाकाली यात्रा व वैद्यकीय सोयीसुविधांविषयी गांभीर्याने कार्यवाही करा – हंसराज अहीर
येत्या १५ दिवसात पुनःआढावा घेण्याचे अहीरांचे सुतोवाच

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : चंद्रपूर महानगरपालिका, केपीसीएल, जिल्हा सामान्य रूग्णालय तसेच पुरातत्व विभागाशी संबंधित विविध प्रलंबित प्रश्न, समस्या व सोयीसुविधांबाबत राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष तथा पूर्व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दि. १८ मार्च २०२५ रोजी आढावा बैठक घेवून उपस्थित अधिकाऱ्यांना समस्या निवारणार्थ तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश देतांनाच येत्या १५ दिवसात या संदर्भातील कार्यपुर्तीविषयी बैठकीच्या माध्यमातून पुनःआढावा घेतला जाईल असे सुचित केले.
चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात प्रलंबित विविध समस्या व कार्य अहवाल संदर्भात आयोजित आढावा बैठकीस जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम, मनपा आयुक्त विपीन पालीवाल, मनपा मुख्य अभियंता बोरीकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चिंचोळे, पुरातत्व विभागाचे अधिकारी कोरे यांचेसह भाजपाचे माजी नगरसेवक राजेंद्र अडपेवार, भाजपा नेते तुषार सोम, राहुल सुर्यवंशी व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
बैठकीस संबोधित करतांना हंसराज अहीर यांनी जिल्हाधिकारी यांना मायनिंग प्रोजेक्टमध्ये पुनर्वसन व खनन नियमांचे तंतोतंत पालन करण्याविषयी सुचित केले. प्रचलित धोरण व नियमास डावलून कोळसा उत्खनन सुरू असल्यामुळे जमीन अधिग्रहण, पुनर्वसन, रोजगार या बाबींची पुर्तता होईस्तोवर उत्खननास स्थगिती द्यावी अशा सुचनाही त्यांनी केल्या.
केपीसीएल बाबत वनविभागाने कोळसा खनन बंदीची कारवाई करीत आहेत. जिल्हाप्रशासनाने सुध्दा नियमबाह्य होत असलेल्या खाणींवर कारवाई करावी तसेच अरबिंदो, आरसीसीपीएल यांचेवर सुध्दा नियमाप्रमाणे कार्रवाई करण्याच्या सुचना केल्या.
अमृत पाणीपुरवठा योजनेच्या जुन्या कंत्राटदारावर कारवाई करून त्यास काळ्या यादीत टाकण्याच्या वारंवार सुचना करूनही मनपा प्रशासनाने त्या कंत्राटदारावर कारवाई करण्यास हलगर्जीपणा दाखवित हेतु पुरस्सर विलंब लावल्याबद्दल अहीर यांनी नापसंती व्यक्त केली. मनपाने सदर कंत्राटदारास काळ्या यादीत टाकण्याची शीघ्र कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. महाकाली यात्रेच्या पार्श्वभुमीवर यात्रेकरूंची नंदीग्राम एक्सप्रेसमुळे यंदा संख्येमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता असल्याने त्यादृष्टीने योग्य नियोजन करून यात्रेकरूंना प्रभावीपणे सोयीसुविधा उपलब्ध कराव्या. या बैठकीत अहीर यांनी मनपा व जिल्हा प्रशासनाच्या पूर्व तयारीचा आढावा सुध्दा घेतला.
महाकाली यात्रेकरूंना चांगल्या सुविधा पुरविण्यावर भर देण्याची तसेच गुरूद्वारामागे यात्रा सुरू होण्यापूर्वी दोन बंधारे बांधून यात्रेकरूंच्या स्नान व अन्य सोयीसुविधांची व्यवस्था करावी अशी सुचना करीत तातडीने अंमलबजावणीच्या तसेच सिवरेजकरिता शहरातील अनेक रस्ते खोदल्याने नागरिकांना प्रचंड त्रास होत असल्याने या रस्त्यांची तातडीने दुरूस्ती करण्याची सुचनाही अहीर यांनी मनपा प्रशासनास केली.
जिल्हा सामान्य रूग्णालयातील विविध समस्या आणि अस्वच्छतेबाबत बिकट परिस्थिती असल्याने सफाई कर्मचाऱ्यांची उपलब्धता करून रूग्णालयात कायम स्वच्छता राहील याची दक्षता घेण्याचे तसेच पेयजलाची व्यवस्था, अमृत दीनदयाल मेडिकल स्टोर्समध्ये आवश्यक औषधीसाठा उपलब्ध राहील याकडे विशेष लक्ष देण्याचे व रक्त तपासणीकरिता एन.ए.टी. मशीन (न्युक्लीक अॅसिड टेस्ट) करीता जिल्हाधिकाऱ्यांकडे तातडीने प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्सकांना दिले.
पुरातत्व विभागाशी निगडीत बाबींवर चर्चा करतांना हंसराज अहीर यांनी परकोटालगत असलेल्या ज्या जुन्या घरांना प्रधानमंत्री आवास योजनेंर्तगत घरकुलाचा लाभ मंजूर अशा नागरिकांना नाहरकत प्रमाणपत्र जारी करण्याचे निर्देश पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. स्वमालकीच्या जागेवर ज्यांची घरे आहेत त्यांना परवानगी देण्यास प्राधान्य देण्याची सुचनाही यावेळी संबंधितांना केली.