अवैध दारू विक्री बंद करण्याची मागणी
गुडसेला येथील महिलांचे ठाणेदारांना निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.संतोष इंद्राळे
जिवती :- तालुक्यापासून सुमारे पंधरा किमी अंतरावर असलेल्या गुडसेला गावात मागील काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची विक्री होत असल्याने वादविवाद, भांडणतंटे वाढले असून महिलावर्गही मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे. अनेक तरुण या व्यसनाकडे वळल्याने अनेकांचे संसार उदध्वस्त तसेच उघड्यावर पडले आहे. यामुळे गुडसेला येथील महिलांनी अवैधरित्या दारू विक्री बंद करावी अशी मागणी केली आहे.
या गावात मागील बऱ्याच दिवसापासून अवैध देशी दारू विक्री सुरू आहे.गावातील ज्येष्ठ व्यक्ती कडून दारू विक्रेत्यांना समजावून सांगितले असता ते ऐकत नाहीत.गावात अशांतता पसरली आहे.
दारू चे दुकान हे सार्वजनिक हातपंप चे बाजूला असून तळीमार अवैध दारू दुकानातून दारू घेऊन हातपंप वर येऊन दारू पितात.तेथे महिला,मुली पाणी भरण्यास आलेल्या असताना त्यांना बाजूला व्हावे लागते.जर एखाद्या महिलेने तेथे दारू पिण्यास विरोध केला तर दारू विक्रेता म्हणतो की हा हातपंप माझ्या जागेत आहे.हातपंपा करिता मी जागा दिली आहे.मी काही करू शकतो.माझ्या मालकीचा हातपंप आहे.असे म्हणत महिलांना अश्लील शिवीगाळ करतो.याच्या गुंड प्रवृत्ती मुळे कोणी महिला पुढे जात नाहीत.
मात्र संसार दारूच्या पुरात वाहून जात आहे.आणि गावातील अल्पवयीन पिढी बिघडत जात आहे हे पाहून महिलांनी पुढाकार घेऊन पोलिस स्टेशन जिवती येथे ठाणेदार यांना निवेदन देऊन ही अवैध देशी दारू बंद करण्याची मागणी केली आहे.यावेळी गावातील मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.