आदिवासी समाजासाठी ‘गोटूल’ भवनाच्या जागेची मागणी

चांदा ब्लास्ट
घुग्घुस: स्थानिक आदिवासी समाजाने नगर परिषद घुग्घुस यांच्याकडे समाजासाठी स्वतंत्र सांस्कृतिक भवन (‘गोटूल’) उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
घुग्घुस परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्य करणाऱ्या आदिवासी समाजाला धार्मिक, पारंपरिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी स्वतंत्र जागेचा अभाव जाणवत आहे. त्यामुळे त्यांना खासगी हॉल किंवा इतर ठिकाणी कार्यक्रम आयोजित करावे लागत आहेत. हा गैरसोयीचा प्रश्न सोडवण्यासाठी समाजातील नागरिकांनी मुख्याधिकारी, नगर परिषद घुग्घुस यांना निवेदन दिले आहे.
निवेदनात नमूद केल्यानुसार, सर्वे नंबर 275 मधील 6300 चौ. फु. पब्लिक ओपन स्पेस ही जागा आदिवासी सांस्कृतिक भवनाकरिता उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. ही जागा बहादे प्लॉट, हनुमान मंदिर चौक, अमराई रोडलगत असल्याने ती सर्वांसाठी सहज उपलब्ध ठरेल.
आदिवासी समाजाने प्रशासनाकडे मागणी करताना सांगितले की, समाजाच्या धार्मिक, सांस्कृतिक व पारंपरिक कार्यक्रमांसाठी ‘गोटूल’ असणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे नगर परिषद घुग्घुसने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.