सिंचन तलावातून पाण्याची चोरी
ग्रामपंचायतीने प्रशासनाकडे कारवाईची मागणी

चांदा ब्लास्ट
चंद्रपूर : मौजा शेणगावच्या ग्रामपंचायत सरपंच पुष्पा मधुकर मालेकर यांनी जिल्ह्यातील जलसंवर्धन अधिकारी आणि घुग्घुस पोलीस स्टेशनला लेखी तक्रार दिली आहे. त्यांनी आरोप केला आहे की गावाच्या सिंचन तलावातून अवैधरीत्या पाण्याची चोरी केली जात आहे.
तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की हा तलाव मृदा व जलसंवर्धन विभागाच्या अखत्यारीत येतो आणि त्याचे पाणी शेतीसाठी राखीव आहे. मात्र, वसंत नामक ठेकेदाराने तलावाच्या गेटवालला तोडून स्वतःचा डिझेल इंजिन बसवून दररोज १५ ते २० टँकर पाणी चोरले. हे बेकायदेशीर कृत्य कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय गेल्या दोन महिन्यांपासून सुरू होते.
गावकऱ्यांना जेव्हा या प्रकाराची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी याची चौकशी केली. त्यात उघड झाले की ठेकेदाराकडे कोणत्याही शासकीय विभागाची परवानगी नव्हती. ग्रामपंचायतीने ठेकेदाराला बोलावून विचारणा केली असता, त्याने स्वतः या पाणी चोरीची कबुली दिली.
सरपंच पुष्पा मालेकर यांनी या घटनेला गंभीर मानत ठेकेदाराने शासकीय नियमांची पायमल्ली केल्याचे सांगितले. त्यांनी जिल्हा प्रशासनाला विनंती केली आहे की संबंधित ठेकेदारावर कठोर कारवाई करून त्याचे नाव काळ्या यादीत टाकावे.
गावकऱ्यांनीही प्रशासनाकडे मागणी केली आहे की सरकारी मालमत्तेचे नुकसान करणाऱ्यांवर आणि पाणी चोरी करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना घडू नयेत.