ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मुदतीत नोंद न झालेल्या खरीप पिकांची ई-पीक पाहणी आता ऑफलाईन 

२४ डिसेंबर २०२५ पर्यंत शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी अर्ज करता येणार 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. विजय वासेकर

पोंभूर्णा :- ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी झाली नाही अश्या शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारने आता ऑफलाईन पीक पाहणीची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली नाही त्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची चिंता दूर झाली आहे.२४ डिसेंबर पर्यंत शेतकऱ्यांना पीक पाहणीसाठी अर्ज करता येणार आहे.जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत, जेणेकरून कोणाही शेतकऱ्याला नुकसान भरपाई आणि सरकारी मदतीपासून वंचित राहावे लागणार नाही.

खरीप पिकांची ई- पीक पाहणीची ऑनलाईन मुदत संपल्यामुळे हजारो शेतकरी शासकीय खरेदी केंद्रावर आपला माल विकण्यापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली होती. तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील अनेक शेतकरी ई-पीक पाहणीाठी ऑनलाईन अर्ज करू शकले नाहीत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आले होते. अशातच सरकारने त्यांच्यासाठी मोठा निर्णय घेतला.

ज्या शेतकऱ्यांची खरीपची ई-पीक पाहणी राहून गेली त्यांना आता ऑफलाईन अर्ज करता येणार आहे.२४ डिसेंबर पर्यंत ते संबंधित अधिकाऱ्याकडे ऑफलाईन अर्ज दाखल करू शकतील.त्यानंतर २५ डिसेंबरपासून ७ जानेवारी पर्यंत ग्रामस्तरावरील समिती प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून स्थळ पाहणी अहवाल दि.८ जानेवारी २०२५ ते १२ जानेवारी उपविभागीय स्तरीय समितीकडे पाठविल्यानंतर उपविभागीय स्तरीय समिती १३ जानेवारी २०२५ ते १५ जानेवारी २०२६ पर्यंत अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करेल.नंतर जिल्हाधिकारी हा अहवाल पणन विभागामार्फत केंद्र सरकारला देतील.

ग्रामस्तरावरील समितीची रचना :- मंडळ अधिकारी या समितीचे अध्यक्ष राहणार असून ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी, सहाय्यक कृषी अधिकारी यांचा या समितीत समावेश आहे.

 ई-पीक पाहणीचे पोर्टल आता बंद झाले आहे. ते पुन्हा सुरु करणे तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही. पण शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने ऑफलाईन खिडकी उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेतकरी ऑफलाईन पद्धतीने ई -पीक पाहणीचा अर्ज करू शकतील.

पोंभूर्णा तालुक्यात खरीपची ई-पीक पाहणी ८३.२६ टक्के झाली आहे.तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे ज्या शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी झाली नाही त्यांनी ऑफलाईन ई-पीक पाहणीची नोंद सातबाऱ्यावर करून घ्यावी. -मोहनिश शेलवटकर, तहसीलदार पोंभूर्णा

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये