Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

विषाक्त बियरने घेतला बारच्या हेल्परचा बळी – ग्राहक युवक अत्यवस्थ

लकी बार अँड रेस्टॉरंट मधील प्रकार - बार व्यवस्थापनाचा हात झटकण्याचा प्रयत्न

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

विषाक्त बियर प्राशन केल्याने बार मधील हेल्परचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना 18 जुन रोजी घडली असुन ग्राहक म्हणून बार मधे आलेल्या दुसऱ्या युवकाची प्रकृती अत्यवस्थ आहे. तो दुसरा युवक चंद्रपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहे.

सविस्तर वृत्त असे की राजुरा शहरातील सोमनाथपुर परिसरात मटण मार्केटच्या बाजूला लकी बार अँड रेस्टॉरंट आहे. ह्या ठिकाणी 17 जुन रोजी रात्री 8:30 – 9:00 वाजताच्या सुमारास अभय लांडे नामक युवक आला. त्याने बियारची मागणी करून बार मधील टेबलवर तो बसला. थोड्याच वेळात त्याला बियर देण्यात आली. दरम्यान तो कुणाशीतरी सतत फोनवर बोलत असल्याचे व वारंवार बाहेर निघत असल्याचे बार मधील वेटरचे म्हणणे आहे. बार मधील वेटरच्या म्हणण्यानुसार काही वेळाने तो ग्राहक अचानक बाहेर निघून गेला. पुढे तो ग्राहक बारच्या बाहेर खाली पडला व त्याला कुणीतरी कार मधे घालुन राजुरा उपजिल्हा रुग्णालयात नेले असेही कळले आहे.

बराच वेळ अभय लांडे परत न आल्याने भगवान गेडाम नामक हेल्परला सदर ग्राहकाची बाटलीत उरलेली बियर फेकण्यास व ग्लास स्वच्छ करायला सांगण्यात आले. भगवानला दारूचे व्यसन असल्याने त्याने ती बियर न फेकता बारच्या बाजुच्या बोळीत जाऊन संपूर्ण बियर प्राशन केली. थोड्याच वेळात त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने तो तिथेच पायरीवर बसला आणि त्याने एका बाजूला मान टाकली. ही घटना तिथे असलेल्या एका कर्मचाऱ्याच्या लक्षात येताच त्याने भगवानकडे व्यवस्थित बघितले असता त्याच्या तोंडातून फेस येत असल्याचे लक्षात आले.

ही घटना बार मधील व्यवस्थापकाने तत्काळ मालकाला कळविली व भगवान गेडाम ह्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात नेले असता त्यांची प्रकृती बघुन आधी दाखल झालेल्या अभय लांडे ह्याला रुग्णवाहिकेतून चंद्रपूरला पाठविण्यात आले. त्यांनतर भगवानला दाखल करण्यात आले मात्र त्याचीही स्थिती गंभीर असल्याने त्यालाही चंद्रपूरला पाठविण्यात आले. मात्र दिनांक 18 जुन रोजी उपचारादरम्यान त्याचे निधन झाले.

घटनेची माहिती कळताच सदर प्रतिनिधीने बार मधे जाऊन चौकशी केली असता वेटर व बार मालक ह्यांच्या बोलण्यात विसंगती आढळुन आली. वेटरच्या म्हणण्यानुसार त्या ग्राहकाने बाहेरून बियर आणली होती तर बार मालकाने बियर माझ्याच बार मधुन घेतली होती असे सांगितले. जर त्याने बाहेरून बियर आणली होती तर बार मध्ये बाहेरून आणलेली बियर पिण्यास परवानगी कशी देण्यात आली हा प्रश्न निर्माण होतो. सदर ग्राहकाने बियर मधे विष केव्हा व कसे मिळविले ह्याबाबतीत कुणीही काहीही बोलायला तयार नसून आम्हाला ह्याबाबतीत काहीही माहिती नाही असे त्यांचे म्हणणे आहे.

ह्या सर्व घटनाक्रमात अनेक बाबी संशयास्पद असल्याचे दिसुन येत आहेत. बार मालकाला तिथे काम करत असलेल्या हेल्परचे आडनाव माहिती नसणे आश्चर्यकारक आहे. महत्वाचे म्हणजे ज्या बाटली मधील बियर अभय लांडे व भगवान गेडाम ह्यांनी प्राशन केली ती बाटली कुठे गेली ह्याची कुणालाही माहिती नाही. ग्राहकाने ज्या ग्लास चा वापर बियर पिण्यासाठी केला तो ग्लास स्वच्छ करून पुरावा नाहीसा का करण्यात आला? कारण आपल्याच आस्थापनेतील कर्मचाऱ्याला विषबाधा झाली तर मग त्याने हाताळलेला ग्लास पुरावा म्हणून जपुन का ठेवण्यात आला नाही असाही प्रश्न उपस्थित होत आहे.

राजुरा उपजिल्हा रुग्णालयातून मेमो व चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयातुन भगवान गेडाम ह्यांच्या मृत्यूची वर्दी मिळाल्यानंतर राजुरा पोलिसांनी सीआरपिसी च्या कलम 174 नुसार मयत भगवान गेडाम याच्याविरुद्ध मर्ग क्र. 46/23 दि. 18/06/2023 अन्वये गुन्हा नोंद केला आहे. बार मालकाच्या म्हणण्यानुसार 20 जुन च्या सायंकाळपर्यंत कुठलीही पोलीस चौकशी झाली नाही अथवा पोलिसांनी बार मधील सीसीटीव्ही फुटेज तपासले नाही. सदर घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असुन ह्या प्रकरणात पोलीस काय कारवाई करते व पुरावे नष्ट केल्यामुळे अथवा झाल्यामुळे तपासात काय निष्पन्न निघते, आत्महत्या करण्यासाठी बियर मधे विष मिसळणाऱ्या अभय लांडे ह्याच्यावर काय कारवाई होते ह्याकडे शहर वासियांचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये