ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पुढाकार

घुग्घुसमध्ये सर्विस रोड व नाली बांधकामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन 

चांदा ब्लास्ट

घुग्घुस शहरातील वाढती वाहतूक, पावसाळ्यात निर्माण होणारी पाणी साचण्याची समस्या आणि नागरिकांना होत असलेला त्रास लक्षात घेता वियानी शाळा ते बोंबले पेट्रोल पंप परिसरात सर्विस रोड व नाली बांधकामाची मागणी पुढे आली आहे. शहर विकास आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांना प्राधान्य देत नगर परिषद घुग्घुसचे सार्वजनिक बांधकाम, शिक्षण व क्रीडा सभापती रोशन पाचारे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अधिकृत पत्राद्वारे ही मागणी मांडली आहे.

गुरुवार, दिनांक 14/05/2026 रोजी कार्यकारी अभियंता शांतनु लता श्रीकांत दुधाडे, सार्वजनिक बांधकाम विभाग, पांढरकवडा, यवतमाल यांना देण्यात आलेल्या निवेदनात घुग्घुस शहरातील मुख्य रस्त्यालगत सर्विस रोड आणि नाली नसल्यामुळे नागरिकांना दैनंदिन प्रवासात अडचणी निर्माण होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेषतः पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचल्याने रस्त्याचे नुकसान होण्याची शक्यता तसेच अपघाताचा धोका वाढत असल्याची बाबही अधोरेखित करण्यात आली आहे.

सार्वजनिक बांधकाम नियमांनुसार मुख्य रस्त्यालगत योग्य जलनिस्सारण व्यवस्था आणि सेवा रस्ते असणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेसह वाहतूक सुलभतेसाठी या कामाला प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. स्थानिक विकासाच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात असून नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.

या निवेदनाची प्रत खासदार प्रतिभा धानोरकर, पालकमंत्री डॉ. अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, आमदार राजू तोडसाम तसेच जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना सविनय पाठविण्यात आली आहे. विविध लोकप्रतिनिधींना माहिती देत प्रशासकीय समन्वयातून शहर विकासाची कामे गतीमान करण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येत आहे.

घुग्घुस शहराच्या नियोजित विकासासाठी मूलभूत सुविधांवर भर देणे ही काळाची गरज असून, नागरिकांच्या हितासाठी करण्यात आलेल्या या सकारात्मक पाठपुराव्याचे सर्व स्तरातून स्वागत केले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये