आसापूरमध्ये अल्ट्राटेकच्या माणिकगड च्या वतीने महिलांना स्तन कॅन्सर आणि मासिक पाळी व्यवस्थापन मार्गदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड सिमेंट वर्क्सच्या वतीने आसापूर या गावामध्ये महिलांना स्तनाचा कर्करोग आणि मासिक पाळी व्यवस्थापनाचे मार्गदर्शन करण्यात आले. त्यासोबतच महिलांना सॅनिटरी पॅड आणि जीवनसत्त्वे व लोहयुक्त सिरपचे वाटपही करण्यात आले.
सद्यस्थितीत महिलांमध्ये स्तन कॅन्सर (Breast Cancer) आणि गर्भाशयाच्या कॅन्सरचे (Cervical Cancer) मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढत आहे. त्यामुळे अशा विषयांवर महिलांना मार्गदर्शन होणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून महिला स्वतःची काळजी घेऊ शकतील. किशोरी मुली आणि महिला मासिक पाळी संदर्भात मोकळेपणाने बोलत नाहीत. महिलांमध्ये हा विषय आजही संवेदनशील आहे. महिला आणि किशोरी मुलींनी या विषयावर बोलले पाहिजे; या कार्यक्रमाच्या माध्यमातून तो एक छोटासा प्रयत्न केला गेला.
कार्यक्रमामध्ये डॉ. सना खान यांनी महिलांना आणि मुलींना अत्यंत मोलाचे असे मार्गदर्शन केले. गावातील सरपंच मंगेश सोयाम यांनी अल्ट्राटेक कंपनीचे मनापासून धन्यवाद मानले. सर्व गावकऱ्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला प्रोत्साहन दिले आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड सिमेंट वर्क्सच्या सीएसआर (CSR) टीमचे आभार मानले.