राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ताकद युवा वर्गातच – कॅप्टन मोहन गुजरकर
एनसीसी छात्र सैनिकांना दिला संदेश
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
वर्धा : ‘आजच्या युवा पिढीला चांगले प्रशिक्षण देऊन त्यातून त्यांच्यात शिस्त, साहस, जागरूकता, देशप्रेम, समर्पित भावना व नैतिक मूल्ये रुजवल्या गेल्यास आदर्श नागरिकांची एक फळी निर्माण होईल. देशासमोरील समस्यांना यशस्वीपणे तोंड द्यायचे असेल तर युवा नागरिक घडवावे लागते. या दृष्टिकोनातून एनसीसी संघटन समर्पित भावनेने काम करीत आहे. राष्ट्रीय एकात्मता टिकवण्याचे महत्त्वाचे आव्हान आपल्यासमोर असून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याची ताकद केवळ युवा वर्गातच आहे, असे प्रतिपादन एनसीसी अधिकारी तथा रोहर स्काऊटचे जिल्हा आयुक्त कॅप्टन मोहन गुजरकर यांनी ९ नोव्हेंबर रोजी सेवाग्राम येथे 21 महाराष्ट्र एनसीसी बटालियन च्या वार्षिक शिबिरात बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित व्याख्यानात केले.
एनसीसी संघटन केवळ सैनिकी प्रशिक्षण देत नसून युवा पिढीच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास करीत असते. हाच दृष्टिकोन समोर ठेवून एन सी सी बटालियनच्या वतीने छात्र सैनिकांकरिता ‘राष्ट्रीय एकात्मता – एक आवाहन व उपाय’ या विषयावर कॅप्टन मोहन गुजरकर यांनी आपले प्रबोधन केले.
आपल्या विषयावर बोलताना पुढे कॅप्टन गुजरकर म्हणाले धर्म ,जात, पंथ, भाषा, प्रांत व स्वार्थी वृत्तीचे लोक हे राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्याकरिता बाधा निर्माण करतात. यावर एकमेव उपाय म्हणजे राष्ट्रीय भावना व देशाच्या प्रति समर्पण निर्माण झाल्यास राष्ट्रीय एकात्मता टिकून राहू शकते आणि याकरिता सुजाण नागरिकांनी निरंतरपणे काम करणे गरजेचे आहे. देशाची दिशा व दशा कशी असावी हे ठरवण्याची ताकद केवळ योग्य व राष्ट्रप्रेमी नागरिकांच्या हाती आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एनसीसी बटालियनचे कमान अधिकारी तथा शिबिर प्रमुख कर्नल समीक घोष तर विशेष अतिथी म्हणून प्रशासकीय अधिकारी लेफ्टनंट कर्नल नवनीत थापा व सुभेदार मेजर दिलबाग सिंग उपस्थित होते.
सदर शिबिरात वर्धा चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील ४०० छात्र सैनिकांचा समावेश असून सदर व्याख्यानास कॅप्टन नंदकिशोर बिजागरे फर्स्ट ऑफिसर विक्रांत भागवतकर, महिला छात्र प्रशिक्षक साधना पाल, सुभेदार हरविंदर सिंग, सुभेदार हरिप्रसाद ग्यानी, सुभेदार रवींदर सिंग व सैन्य दलाचे प्रशिक्षक वर्ग उपस्थित होते.