ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ना. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे बल्लारपूरच्या शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराईचे नाव

ना.मुनगंटीवार यांचा पत्रव्यवहारानंतर राज्य सरकारचा निर्णय ; जिल्ह्यातील ऐतिहासिक वैभव जतन करण्यासाठी पुढाकार

चांदा ब्लास्ट

 राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पत्रव्यवहारानंतर राज्य सरकारने बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराई यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ऐतिहासिक वैभव जतन करण्याच्या दृष्टीने ना. श्री. मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांना पुन्हा एकदा यश आलं आहे.

काही दिवसांपूर्वी चंद्रपूर येथील मुलींच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला राणी दुर्गावती तर पोंभुर्णा येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला भगवान बिरसा मुंडा यांचे नाव देण्याची घोषणा सरकारने केली. आता बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक संस्थेला राणी हिराई यांचे नाव देण्याचा निर्णय देखील राज्य सरकारने जाहीर केला.

यासंदर्भात ना. श्री. मुनगंटीवार यांनी कौशल्य, रोजगार व उद्योजकता मंत्र्यांना पत्र लिहून मागणी केली होती. मागणी करण्यात आणि त्याला मंजुरी मिळण्यात देखील अवघ्या काही दिवसांचेच अंतर होते. त्यामुळे राज्य सरकारने निर्णय जाहीर केल्यानंतर आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. ‘राणी हिराई शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण तातडीने करण्यासंदर्भात संबंधितांना आवश्यक निर्देश द्यावे, असे पत्र १ ऑक्टोबर २०२४ ला ना. श्री. मुनगंटीवार यांनी संबंधित मंत्रालयाला दिले होते. त्यानुसार आता कार्यवाही सुरू झालेली आहे, हे विशेष.

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना शौर्याचे प्रतिक असलेल्या महान व्यक्तिमत्वांची नावे दिल्याने भावी पिढीला तसेच तरुणांना प्रेरणा मिळेल. त्यांना आपल्या सामाजिक जबाबदारीची कायम जाणीव राहील, असा विश्वास ना. श्री. मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.

आदिवासी बांधवांनी मानले ना. मुनगंटीवार यांचे आभार

चंद्रपूर आणि बल्लारपूर येथील गोंड साम्राज्याची धुरा यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या आणि अफाट शौर्याचे प्रतीक असलेल्या राणी हिराई यांचे नाव शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला दिल्याबद्दल आदिवासी बांधवांनी ना. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत. राणी दुर्गावती, भगवान बिरसा मुंडा,राणी हिराई या तीनही महान व्यक्तिमत्वाचे नाव जिल्ह्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला देण्याची संधी मिळाली, हे आपले भाग्य असल्याचे ना. श्री. मुनगंटीवार म्हणाले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये