Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ

उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे घर फोडून डीवीआर लांबविला

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

 वरोरा हद्दीतील बोर्डाच्या मातोश्री नगरातील घटना 

वरोरा : शहरात दिवसेंदिवस वाढणाऱ्या चोरीच्या घटनांनी सर्वसामान्य जनता जेरीस आली असताना डायरेक्ट अप्पर पोलीस अधीक्षक तथा वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी नयोमी साटम (भा.पो.से.) यांच्या भाड्याच्या घरात चोरी करून चोरट्यांनी पोलीस यंत्रणेला एकप्रकारे आव्हानच दिले आहे. परिणामतः शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांना जनतेला तोंड दाखविणे नामुष्कीचे झाले आहे.

       याबाबत अधिक वृत्त असे की, वरोरा उपविभागीय क्षेत्रातील उपविभागीय पोलीस अधिकारी तथा अप्पर पोलीस अधीक्षक नयोमी साटम ह्या वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बोर्डा येथील मातोश्री नगरात भाड्याने राहतात. वरोरा उपविभागीय क्षेत्रातील गणेशोत्सव शांततेत पार पडल्या नंतर शनिवार- रविवार या शासकीय सुट्टया जोडून त्या रजेवर गावी गेल्या होत्या.त्यांच्या घराला कुलूप होते. घरी कोणी नसल्याची सुवर्णसंधी साधून अज्ञात चोरट्यांनी त्यांचे घर फोडले. घर फोडून आत प्रवेश केल्यानंतर मौल्यवान सामान, वर्दी – बंदूक आदी चोरट्यांच्या नजरेत आली असावी. त्यामुळे बहुतेक ते घाबरल्याने त्यांनी जास्त मौल्यवान सामान चोरीचा प्रयत्न टाळला असावा,असे बोलले जात आहे. घरात सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने सीसीटीव्ही कॅमे ऱ्यात आलो तर आपण पकडल्या जाऊ , या भीतीपोटी सीसीटीव्ही कॅमेरातील डीवीआर चोरट्यांनी पळविला.

    सदर चोरीची घटना २० ते २२ सप्टेंबर २०२४ च्या पहाटे घडली असावी,असा कयास आहे. नयोमी साटम यांच्या घरी काम करणारी मोलकरीण सकाळी जेव्हा घरकामासाठी आली तेव्हा घटना उघडकीस आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी साटम यांचेशी संपर्क करून तिने माहिती दिली. मोलकरीण बाईच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर वरोरा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होताच वरोरा पोलिसांनी तपासाला वेग दिला असल्याचे कळते.

सेवानिवृत्त शिक्षक दांपत्याचे घर फोडले; आंघोळ केली, चोरीचे सामान ठेवून चोर गायब

   वरोरा येथील अभ्यंकर वार्डातील सेवानिवृत्त शिक्षक दांपत्य घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्यानी घर फोडून घरात प्रवेश केला. सोने ,नगदी त्यांनी बँकेत ठेवले होते, घरी चांदीचे दागिने होते. चोरांनी या सामानाला हात लावला नाही . बहुतेक कुलूप तोडण्यास लागलेल्या श्रमाने घामाघूम झालेल्या चोरट्याने स्नानाचा यथेच्छ आनंद घेतला.चोरटा घरात चोरी न करता निघून गेला जाताना मात्र आपले अंग वस्त्र व चोरीसाठी वापरलेली सलाख सोडून गेल्याचे कळते.

    गेल्या काही दिवसांपासून शहरात चोरीच्या घटनेत मोठी वाढ होतांना दिसत आहे. काबाडकष्ट करून प्रसंगी पोटाला चिमटे काढून जमा केलेली रक्कम व किमती ऐवज चोरटे लंपास करत असल्याने नागरिक चिंताग्रस्त आहेत. सर्वसामान्यांना चोरट्यांनी नाकी नऊ आणले असताना अधिकारी वर्ग त्यांच्या निशाण्यावर असल्याचे दिसून येते. चार महिन्यांपूर्वी दिवाणी न्यायाधीश डी. आर.पठाण यांच्या घरी चोरी करून चोरट्यांनी कहरच केला होता.ते आरोपी अद्याप गवसले नसताना अप्पर पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे घर फोडून चोरट्यांनी पोलिसांना खुले आव्हानच दिले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी तोडपाणी करण्यासाठी इकडे तिकडे निगराणी ठेवण्यापेक्षा सर्वसामान्य जनतेच्या सुरक्षेकडे अधिक लक्ष देण्याची गरज असल्याचे बोलले जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये