कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पी.एम. किसान सन्मान निधी : चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून पूर्ण करा ई-केवायसी

ई-केवायसी पूर्ण झालेली नसल्यास मिळणार नाही १४ वा हप्ता

चांदा ब्लास्ट 

देशातील अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरीता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना १ डिसेंबर २०१८ पासून सुरू केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये आर्थिक मदत म्हणून देण्यात येत आहे. पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांच्या अंतराने प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली जात असून आतापर्यंत सदर योजनेच्या १३ हप्त्यांचे प्रदान करण्यात आले आहे.
तसेच सदर योजनेच्या १४  व्या हप्त्याचे वितरण माहे जुन २०२३ मध्ये करण्यात येणार आहे. मात्र ई-केवायसी पूर्ण झाली नसल्यास संबंधित लाभार्थी शेतक-याला १४ व्या हप्त्यापासून वंचित राहावे लागू शकते. त्यामुळे त्वरीत ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे चेहरा प्रमाणीकरणाच्या माध्यमातून आता ई-केवायसी करता येणार आहे.
केंद्र शासनाच्या धर्तीवर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिरीक्त लाभ म्हणून ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना सुरू करण्यास कॅबीनेट मध्ये मंजूरी मिळाली आहे. पी.एम. किसान निधी मधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर महाराष्ट्र शासनातर्फे वर्षाला अतिरीक्त सहा हजार रुपये जमा करण्यात येईल. त्यामूळे महाराष्ट्रातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात केंद्र शासनातर्फे वार्षिक सहा हजार व राज्य शासनातर्फे वार्षिक सहा असे एकंदरीत वर्षाला १२ हजार रुपयांची आर्थिक मदत जमा केली जाणार आहे.
पीएम किसान सन्मान निधी योजनेची रक्कम मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी व बँक खात्याला आधार जोडणी पूर्ण केली असणे आवश्यक आहे. ई-केवायसी तथा बँक खात्याला आधार जोडणी प्रक्रिया पूर्ण न झाल्यास शेतकऱ्यांना केंद्र शासनाच्या पी.एम. किसान सन्मान निधीचा १४ हप्ता व पुढील हप्ते तसेच राज्य शासनाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी या दोन्ही योजनांचा लाभ मिळणार नाही. त्यामूळे ज्या शेतकऱ्यांना आजतागायत १३ हप्ते प्राप्त झालेले आहे, परंतू, ई-केवासी अद्याप केलेली नाही त्यांना पुढील हप्त्यांचा लाभ मिळणार नाही.
जिल्ह्यात सध्या एकंदरीत ३३३०९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे प्रलंबित असून त्यापैकी बल्लारपूर (५५५), भद्रावती (२०१२), ब्रम्हपूरी (३४३०), चंद्रपूर (८२२), चिमूर (५९७३), गोंडपिपरी (१३०६), जिवती (१२३६), कोरपना (१६९३), मूल (२६३४), नागभीड (२६९८), पोंभूर्णा (१२५१), राजूरा (२०९८), सावली (२५९१), सिंदेवाही (२११४) आणि वरोरा (३००९) शेतकऱ्यांचे ई-केवायसी करणे प्रलंबित आहेत.
कशी करावी ई-केवायसी :
 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील ई-केवायसी झालेली नसलेल्या शेतकऱ्यांची यादी गावातील कृषी सहाय्यक यांचेकडे तथा ग्रामपंचायत स्तरावर उपलब्ध असून सदर योजनेच्या लाभार्थ्यांनी ई-केवायसी झाली नसल्यास कृषी विभागाचे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. तसेच, आपले नोंदणीची स्थिती जाणून घेणेकरीता पुढील प्रणालींचा वापर करावा. पी. एम. किसान पोर्टलवरील शेतकरी कॉर्नर मधील (ई- केवायसी) ओटीपी आधारीत सुविधेद्वारे केवायसी प्रमाणीकरण करून घ्यावे किंवा नजीकच्या सामाईक सुविधा केंद्रामार्फत (सीएससी) किंवा केंद्र शासनाच्या पीएम किसान जी.ओ.एल (Government Of India) ॲप द्वारे.
पीएम किसान जीओएल अॅप वापरण्याची कार्यपद्धती :
केंद्र शासनाने अँड्रॉईड मोबाईलवर फेस ऑथेंटिकेशन (चेहरा प्रमाणीकरण) अॅपद्वारे पीएम किसान सन्मान योजनेच्या लाभार्थ्यांना ई केवायसी (ई-केवायसी) प्रमाणिकरण करण्यासाठी नवीन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना स्वतःचे तसेच इतर लाभार्थ्यांचे सुद्धा ई-केवायसी करता सहजतेने पूर्ण येणार आहे.
अशी आहे प्रक्रिया :
१. सर्वप्रथम गुगल प्ले स्टोअर वरून ‘पीएम किसान जीओएल’ हे अॅप  डाउनलोड करून घ्यावे. तत्पूर्वी जुने पीएम किसान अॅप असल्यास त्यास डिलिट करून पुन्हा पीएम किसान अॅप २.०.० हे अॅप्लिकेशन इंस्टॉल करावे. त्यानंतर येणाऱ्या स्क्रीनवर इंग्रजी व हिंदी यापैकी एक भाषा निवडा. २. स्क्रिनवर नवीन शेतकरी नोंदणी आणि लॉगिन यापैकी ‘पीएम किसान’ योजनेतील नोंदणीकृत लाभार्थ्यांनी लॉगिन या बटणावर क्लिक करावे. अॅप वापरासाठी शेतकऱ्यांकडे त्यांचा पी. एम. किसान नोंदणी आयडी किंवा आधार क्रमांक तसेच आधार क्रमांकाला जोडलेला मोबाईल क्रमांक चालु स्थितीत असणे आवश्यक आहे. ३. स्क्रीनवरील लॉगिन टाईप मधील लाभार्थी पर्याय निवडून पीएम किसान नोंदणी आयडी किंवा आधार क्रमांकाद्वारे लॉगिन करण्यासाठी गेट ओटीपी बटनावर योजनेसाठी रजिस्टर केलेल्या मोबाईलवर आलेला चार अंकी (ओटीपी) टाकून लॉगिन करावे. त्यानंतर पुढील स्क्रीनवर स्वतःचा सहा अंकी (एम पिन) तयार करावा. एम पिन च्या माध्यमातून लाभार्थ्यास अॅप मध्ये लॉगिन करणे व ई-केवायसी करणे सोयीचे होईल. ४. ज्या नोंदणी आयडी किंवा आधार क्रमांकावरून लॉगीन केले, त्या लाभार्थ्यांचे ई-केवायसी प्रमाणिकरण प्रलंबित असल्यास “तुमचे ई-केवायसी पूर्ण होण्यासाठी प्रलंबित आहे” असा संदेश दिसेल. त्यानंतर आपले पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा इ-केवायसी यावर क्लिक केल्यावर लाभार्थ्यांनी तयार केलेला सहा अंकी एम पिन तेथे टाकावा. त्यानंतर कन्सेंट फॉर्म वर क्लिक करून चेहरा स्कॅन करा वर त्यानंतर समोर फेस आर डी अॅप डिव्हाइसवर स्थापित केलेले नाही असा संदेश येईल आणि त्यावर ठीक आहे म्हणा. त्यानंतर गुगल प्ले स्टोअर आधार फेस आरडी (ईअरली एसेस) हे अॅप इंस्टॉल करण्यासाठी उपलब्ध होईल.
ते स्थापित करा. त्यानंतर मोबाईलमध्ये चेहरा कॅप्चर करत आहे असे सुरू होईल. त्यावेळी आलेल्या सूचनांचे पालन करून पुढे जा या बटणावर क्लिक करावे. ,५. मोबाईल समोर धरून चेहऱ्यावर प्रकाश दिसेल, अशा पद्धतीने चेहरा स्कॅन करा या बटणावर. त्यानंतर कॅप्चर केलेल्या प्रतिमा यशस्वीरित्या प्रक्रिया करत आहेत. असा संदेश स्क्रिनवर आल्यानंतर  यशस्वी  ई-केवायसी असा संदेश दिसेल. म्हणजेच लाभार्थ्याचे  ई-केवायसी प्रमाणीकरण पूर्ण झाले. इतर लाभार्थीचे ई-केवायसी करण्यासाठी डॅशबोर्ड वरील इतर लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी या बटणावर क्लिक करून वरीलप्रमाणे प्रक्रिया पूर्ण केल्यास आपली प्रक्रिया पूर्ण होईल.
ई-केवायसी पूर्ण झालेली नसल्यास मिळणार नाही १४ वा हप्ता. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १४ व्या हप्त्याचा व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी जवळचे ग्राहक सेवा केंद्र किंवा कृषी विभागाचे कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून किंवा (पी.एम. किसान योजना) या अॅप च्या माध्यमातून ई-केवायसी ची प्रक्रीया तातडीने पूर्ण करून घेण्याबाबत चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आवाहन केले आहे.
#P.M. Kisan Samman Fund
#14th installment will not be available if e-KYC is not completed
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये