Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रिपब्लिकन ही तथागत बुद्ध यांची जागतिक विचारधारा आहे. यांचे जतन करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे – रमेश जीवने

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

रिपब्लिकन ही तथागत बुद्ध यांची जागतिक विचारधारा असून त्यांचे प्रतिबिंब रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षात बाबासाहेबांनी अधोरेखित केले आहे. बाबासाहेबांच्या आंबेडकरी चळवळीतील अनुयायी कार्यकर्त्यांनी यांचे जतन, संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. रिपब्लिकन चळवळ प्रामाणिकपणे उभी करायची असेल तर कोणत्याही नेत्याच्या मागे लागायचे नसून बाबासाहेबांच्या स्वाभिमानी आणि निष्ठावान अनुयायी कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे सभासदत्व स्वीकारून संविधानानुसार बहुमताच्या निकषाने नेता स्वीकारून एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्याच्या दिशेने वाटचाल करायची आहे. बाबासाहेबांच्या वैचारिक लेकरांनी पक्षांतर्गत नेत्याला नाही तर लोकशाही संविधानाला सर्वोच्च प्रमाण मानून संविधानानुसार ज्यांच्याकडे बहुमत असेल त्याला पुढील निवडणुकीपर्यंत अध्यक्ष मानून रिपब्लिकन पार्टी संरक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करीत राहिले पाहिजे. बाबासाहेबांच्या विचारांचा आवाज संसदेत घुमवायचा असेल कोणत्याही परिस्थितीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचे सभासदत्व स्वीकारावे लागणार असून बहुमताने आपला योग्य नेता निर्वाचित करून एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही.

तसेच विद्यमान सरकार आपल्या मनमानी पद्धतीने कारभार करत असून अनुसूचित जाती जमातीचे प्रतिनिधित्व नष्ट करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाला पुढे करून राज्य घटनेत लवलेश नसलेले घटनाबाह्य वर्गीकरण, क्रिमीलिअर थोपवित आहे. यांचा समर्थपणे सामना करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील बौद्धांशी जवळीक साधत भारतातील अनुसूचित जातीची व जमातीची एकसंघ संघटनशक्ती निर्माण करण्यासाठी मोट बांधण्या कामी व्यापक विचारमंथन केले पाहिजे. बौद्धांना जाती विरहित प्रतिनिधित्व पाहिजे असल्यास त्यांनी जाती विरहित जनगणना झाली पाहिजे, यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. असे प्रतिपादन ख्यातनाम रिपब्लिकन विचारवंत रमेश जीवने यवतमाळ यांनी केले. ते ऐतिहासिक बुद्धभूमी, गडचांदूर येथे ८ सप्टेंबर रोजी रिपब्लिकन जागृती अभियानने आयोजित करण्यात आलेल्या चिंतन बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संस्थापक डॉ बाबासाहेब आंबेडकर या पक्षाच्या पुनर्बांधणीची दिशा या आणि अनुसूचित जातीचे वर्गीकरण क्रिमीलिअर आणि बौद्धांचे आरक्षण या दोन्ही विषयावर बोलताना व्यक्त केले.

चिंतन बैठकीचे अध्यक्ष रमेश पाटील, सेवानिवृत्त प्राचार्य, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सोनुर्ली, मुख्य मार्गदर्शक रमेश जीवने प्रसिद्ध रिपब्लिकन विचारवंत, यवतमाळ, प्रमुख पाहुणे भंते कश्यप, ऐतिहासिक बुद्धभूमी गडचांदूर, कोमल रामटेके चंद्रपूर, देशकुमार खोब्रागडे चंद्रपूर, जेकब धुपे चंद्रपूर, डॉ. रविंद्रनाथ पाटील चंद्रपूर, प्रेमदास मेश्राम आदिवासी नेते गडचांदूर विचारपीठावर उपस्थित होते.

सदर चिंतन बैठकीचे अध्यक्ष रमेश पाटील, यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना म्हणाले की एकाच ध्येय उद्देशाने प्रेरित बाबासाहेबांना अपेक्षित शासनकर्ती जमात बनविण्यासाठी वेगवेगळ्या समांतर पक्ष संघटना काढून मत आणि विचारांची विभागणी करत असेल तर असे बाबासाहेबांचे अनुयायी कार्यकर्ते स्वप्नात सुद्धा शासनकर्ते बनू शकणार नाहीत. यासाठी व्यापक जनहित लक्षात घेऊन नेत्यांच्या पक्ष संघटना बाजूला सारून आपले उपकारकर्ते बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया संविधानानुसार उभा करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकात सांगितले की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष संविधानानुसार उभा करायचे सोडून बाबासाहेबाची विचारधारा आणि बाबासाहेबांचा वापर करून वेगवेगळ्या समांतर पक्ष संघटना तसेच रिपब्लिकन पक्षाला अबकड लावणारे हे बाबासाहेबांच्या विचारांचे, बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांचे अस्तीनीतील दुश्मन आहेत. हे दुश्मन बाबासाहेबांचा रिपब्लिकन पक्ष कधीच उभा होऊ देणार नाही. कारण समानतेचा हक्क आणि अधिकार देणारा रिपब्लिकन पक्ष उभा झाल्यास स्वार्थी आणि आपमतलबी नेत्यांच्या दुकानदाऱ्या बंद पडणार आहे. यासाठी बाबासाहेबांच्या विरोधकांचा सामना करण्याच्या पहिले अस्तीनीतील सापाचा बंदोबस्त करावा लागणार आहे.

तसेच अनुसूचित जातीचे वर्गीकरण क्रिमीलिअर आणि बौद्धांचे आरक्षण हा प्रस्थापित वर्णवर्चस्ववाद्याच्या फार मोठा षडयंत्राचा भाग आहे. हे षडयंत्र नष्ट करायचे असेल तर बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांनी एकसंघ संघटनशक्तीने मुकाबला करावा लागणार आहे.

याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा रिपाइं कार्यकारिणीचे कोमल रामटेके यांनी बाबासाहेबांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आपल्या नाकर्तेपणामुळे मोडकळीस आलेला आहे. याला उर्जाबळ देणे ही तथाकथित नेत्यांची नाही तर बाबासाहेबांच्या अनुयायी कार्यकर्त्यांची नैतिक जबाबदारी असताना आम्ही तथाकथित नेत्यांच्या वेगवेगळ्या समांतर पक्षाला पाठबळ देऊन विचारांचे धृवीकरण करीत आपल्याच पायावर दगड पाडून घेत आहोत. असे प्रतिपादन केले.

गडचांदूर येथील आदिवासी नेते प्रेमदास मेश्राम यांनी हे मनुवादी सरकार दलित पिडीत, आदिवासी यांच्या जीवावरच उठले असून यांना संविधानानुसार उभे करण्याची संधी हिरावून घेत आहेत. म्हणूनच या सरकारनी अनुसूचित जाती आणि जमातीत घटनाबाह्य वर्गीकरण आणि क्रिमीलिअर बसविण्याचा घाट घातला आहे. या माध्यमातून येथील दलित आणि आदिवासी यांना सर्व सोयी सुविधा, आरक्षणा पासून बेदखल करून भुके कंगाल करण्याचे षडयंत्र आहे. हे षडयंत्र हाणून पाडण्यासाठी या दोन्ही समाजांची एकसंघ संघटनशक्ती निर्माण करणे गरजेचे आहे.

याप्रसंगी चंद्रपूर रिपाइंचे डॉ. रविंद्रनाथ पाटील यांनी लोकशाहीत नेता निवडणुकी पुरता प्रमुख असून सर्वश्रेष्ठ संविधानाच्या चिरंतन अस्तित्वासाठी नेत्यांना बदलते ठेवणे गरजेचे आहे. त्यामुळे आपलाच नेता मोठा, आदर्श, स्वाभिमानी म्हणून उदात्तीकरण करायचे नसून नेत्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ संविधान आहे. ही जाणीव कायम ठेवून आणि संविधानातील समानतेच्या तत्त्वानुसार सर्व सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा सर्वोच्च पदाच्या दर्जाची आणि संधीची उपलब्धता मिळवून देण्यासाठी नेत्याला संविधानानुसार वागण्यास भाग पाडायचे आहे. असे प्रतिपादन केले.

मार्गदर्शनपर भाषणानंतर झालेल्या चर्चासत्रात दशरथजी डांगे, गौतम भसारकर, सुभाष रामटेके, येरगव्हाण, गौतम रत्ने, भेदोडा, रामदास रामटेके उपरवाही, विवेक बक्षी बामणवाडा, सुरजभाऊ उपरे, हरदोना, उमाकांत वाघमारे, साखरी (वाघोबा) पद्माकर वनकर, ईश्वर पडवेकर सोनुर्ली, जगजीवन बोरकर, प्रेम वानखेडे, रविकुमार वाघमारे, किरण मोडक, अनंताभाऊ रामटेके नांदा फाटा, प्रभाकर खाडे इत्यादींनी सहभाग घेतला.

सदर चिंतन बैठकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी करीता अशोककुमार उमरे रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक आणि कोरपना तालुका संघटक म्हणून जगजीवन बोरकर सेवानिवृत्त शिक्षक गडचांदूर यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भेदोडा त. राजुरा येथील रिपब्लिकन गौतम रत्ने यांनी केले तर आभार प्रदर्शन रिपब्लिकन सेवानिवृत्त शिक्षक जगजीवन बोरकर यांनी केले.

चिंतन बैठक यशस्वी करण्यासाठी अशोककुमार उमरे, विवेक बक्षी सर, विवेक मल्लेश दुर्गे, रामदास रामटेके, उपरवाही, अनंताभाऊ रामटेके नांदा फाटा, सुरजभाऊ उपरे, उमाकांत वाघमारे साखरी (वाघोबा) नामदेव लांडगे, दशरथ संपत डांगे, पद्माकर महादेव वनकर, विनायक माधव कांबळे, सुभाष रामटेके येरगव्हाण, प्रेम वानखेडे, ईश्वर पडवेकर, एकनाथ पाटील, किरण मोडक, रविकुमार वाघमारे, जगजीवन बोरकर, दीपा वामन उंदीरवाडे, वामन उंदीरवाडे, प्रकाश कवाडे, प्रभाकर खाडे, निलकंठ खाडे इत्यादींनी मोलाचे सहकार्य व योगदान देऊन चिंतन बैठक यशस्वी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये