Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आज चंद्रपुरात छत्रपती शिवाजी महाराज अवमान विरोधात निषेध मोर्चा

हजारो शिवप्रेमी नागरिक काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करून निषेध मोर्च्यात सहभागी होणार

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला पुतळा एकाएकी कोसळून पडला. या घटनेचा निषेध आज विविध सामाजिक संघटना आणि सर्वपक्षीय लोकांच्या वतीने करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशाचे आराध्य दैवत आहे. छत्रपती शिवराय हे आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा, स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सन्मानाचा विषय आहे. शिवरायांच्या नावावर या महाराष्ट्रात नेहमीच सत्ता स्थापन झालेली आहे. असे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा जलदुर्ग असलेल्या सिंधुदुर्ग शेजारी राजकोटवर आठ महिन्यापूर्वी उभारलेला शिवछत्रपतींचा पुतळा एकाएकी कोसळून पडतो, ही अत्यंत संतापजनक आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला डाग लावणारी बाब आहे. या पुतळ्याचे उद्घाटन देशाचे प्रधानमंत्री मा. नरेंद्र मोदी यांनी केलेले होते. भारतीय नौदलाच्या अखत्यारीत या पुतळ्याचे बांधकाम पूर्ण झालेले असताना फक्त आठ महिन्यात हा पुतळा अपमानास्पद स्थितीत कोसळून पडावा, हा संपूर्ण महाराष्ट्राचा नव्हे तर देशाचा अपमान आहे. त्याचबरोबर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली, कर्तुत्ववान इतिहासाचा सुद्धा घोर अवमान आहे. या भयानक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेमध्ये तीव्र संताप असून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झालेला आहे.

महाराष्ट्राची अस्मिता असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळा बांधकामात भ्रष्टाचार व्हावा, ही क्लेशदायक घटना आहे. 350 वर्षापूर्वी खुद्द शिवाजी महाराज यांनी बांधलेला सिंधुदुर्ग हा किल्ला दिमाखात उभा असताना ८ महिन्यापूर्वी उभा केलेला पुतळा पडतोच कसा? या पुतळ्याचे बांधकाम करताना आवश्यक ती काळजी घेतली गेली नाही. त्यामुळे गांभीर्याने या घटनेची दखल घेऊन शिल्पकार आपटे, कंत्राटदार चेतन पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, त्यांचे सहकारी आणि या घटनेसाठी दोषी असलेल्या सर्वांवर ताबडतोब कठोर कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे व त्यांना अटक करण्यात यावी. या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, शिवस्मारकाच्या नावावर झालेल्या फसवणुकीचा व वारंवार छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान करणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी बुधवार, ४ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता चंद्रपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक (गिरनार चौक) ते जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर असा निषेध मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये