Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

विधानसभेची तिकीट मिळू नये म्हणून आमचे पक्षातून निलंबन – डॉ. विजय देवतळे ह्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

विधान परिषदेत पक्ष विरोधी भूमिका घेणारा चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार कोण? देवतळेंच्या आरोपाने चर्चांना उधाण

चांदा ब्लास्ट जिल्हा प्रतिनिधी

जितेंद्र चोरडिया, चंद्रपूर

भद्रावती : पक्षविरोधी कोणतेही काम केले नसताना पक्षासाठी इमाने इतबारे काम करीत असताना सुद्धा केवळ आगामी विधानसभेसाठी या भागातील काँग्रेस उमेदवारीचे प्रबळ दावेदार न व्हावे म्हणून या क्षेत्रातील पक्षाच्या एका प्रबळ नेत्याच्या सांगण्यावरून आम्हा दाम्पत्याला पक्षश्रेष्ठींने आमचे म्हणणे न ऐकता ६ वर्षासाठी निलंबित केले. हा आम्हाला राजकारणातून संपविण्याचा डाव असल्याचा खळबळजनक आरोप डॉ. विजय देवतळे यांनी पत्र परिषदेत केला.

एखाद्या प्रकरणावर न्याय देताना न्यायालय दोन्ही बाजू ऐकून न्याय देते. परंतु या ठिकाणी त्या नेत्याचेच म्हणणे ऐकून आम्हा पती पत्नीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे आदेशाने नाना गावंडे यांनी ६ जुलै २०२४ ला पत्र देऊन ६ वर्षाकरिता पक्षातून निलंबित केले. हे निलंबन घटनाबाह्य आहे. पक्षश्रेष्ठींनी आमचे म्हणणे ऐकून नंतर त्यावर निर्णय द्यावयास पाहिजे होता.

स्वातंत्र्या पूर्वीपासून देवतळे घराणे काँग्रेस सोबत आहे. स्वर्गीय दादासाहेब देवतळे हे सन १९६२ मध्ये या भागातून आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी मंत्रिपद देखील भूषविले. त्यांचे पश्चात स्वर्गीय संजय देवतळे यांनी या भागाचे नेतृत्व केले. ते सुद्धा मंत्री राहिले. सन २०१४ मध्ये संजय देवतळे यांना पक्षाने लोकसभेकरिता तिकीट दिली. त्यात ते पराभूत झाले. नंतरच्या विधानसभेकरिता पक्षाने त्यांना विधानसभेची तिकीट न देता माझी पत्नी डॉ. आसावरी देवतळे यांना तिकीट दिली. त्यावेळी संजय देवतळे भाजपाकडून लढले. मत विभाजनामुळे शिवसेनेचे बाळू धानोरकर निवडून आले. सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाने शिवसेनेच्या बाळू धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यावेळी आम्ही उभयतांनी पक्षाचे उमेदवार बाळू धानोरकर यांचा प्रचार करून निवडून आणले. नंतरच्या विधानसभेकरिता त्यांनी आपली पत्नी प्रतिभा धानोरकरांना तिकीट मिळवून दिली. प्रतिभा धानोरकर यांचे काँग्रेस पक्षात कोणतेही योगदान नव्हते. या माध्यमातून आमच्यावर पक्षाने त्यावेळी अन्याय करून सुद्धा आम्ही पक्षाशी ईमान राखून काम करीत आहोत. आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे आम्ही प्रबळ दावेदार उमेदवार म्हणून होतो.मात्र आम्हास पक्षश्रेष्ठींने काही कारण नसताना ६ वर्षाकरिता पक्षातून निलंबित केले. पक्षश्रेष्ठीने आमचे हे निलंबन मागे घ्यावे असे डॉ.विजय देवतळे यांनी यावेळी सांगितले.

विधानसभेच्या गोपनीय मतदान प्रक्रियेत या नेत्याने पक्षविरोधी मतदान केल्याचा गौप्यस्फोट डॉ. विजय देवतळे ह्यांनी पत्रकार परिषदेत केला असून त्या संबंधित आमदाराने पक्षविरोधी कारवाया करूनसुद्धा पक्षश्रेष्ठींने त्यांचेवर कोणतीच कारवाई केली नाही. परंतु त्याच लोकप्रतिनिधीच्या सांगण्यावरून आम्हास पक्षातून निलंबित केले हा कसा न्याय? असा सवालही डॉ. देवतळे यांनी केला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये