Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

बल्लारपूर विधानसभा क्षेत्रासाठी नाना पटोलेंची डॉ. अभिलाषा गावतुरेंना पसंती?

आपल्या समर्थकांची वर्णी लागणार की नाही म्हणून वडेट्टीवार-धानोरकर-धोटे गटात अस्वस्थता

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात सलग दुसऱ्यांदा विजय प्राप्त केल्याने काँग्रेसच्या गोटात आत्मविश्र्वास बळावला असुन सर्वच विधानसभा क्षेत्रात विजयाची खात्री असल्यागत इच्छुकांची मांदियाळी निघाली आहे. बल्लारपुर विधानसभा मतदार संघात कॉग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी यासाठी तीव्र स्पर्धा सुरू झाली आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेेते विजय वडेट्टीवार गटाकडून चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेेचे अध्यक्ष संतोष रावत यांचे तर खासदार प्रतिभा धानोरकर व कॉग्रेस ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुभाष धोटे गटाकडून माजी नगराध्यक्ष घनश्याम मुलचंदानी यांचे नाव दिल्लीला पाठविण्यात आले आहे. दरम्यान या दोघांना शह देत डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नाव दस्तुरखूद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्लीला पाठविल्याची माहिती राजकीय वर्तुळात आहे. कॉग्रेस पक्षातील इतकी तीव्र गटबाजी बघता कॉग्रेसवाले एकमेकांना पाडण्यात धन्यता मानणार असेच काहीसे चित्र येथे दिसत आहे.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा गड राहिलेला बल्लारपूर विधानसभा मतदार संघ लोकसभा निवडणुकीपासून चर्चेत आहे. त्याला कारण लोकसभा निवडणुकीत बल्लारपूर मतदार संघातून कॉग्रेसच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांना ४८ हजार मतांची आघाडी मिळाली. धानोरकर यांना मिळालेल्या या आघाडीमुळे कॉग्रेस पक्षातील प्रत्येकाला आता आमदारकीचे स्वप्न पडायला लागले आहे. हवसे, नवसे, गवसे आमदार होण्याचे स्वप्न बघत प्रचाराच्या रिंगणात उतरले आहे. बल्लारपूरातुन प्रामुख्याने वडेट्टीवार गटाचे जिल्हा बँकेेच अध्यक्ष संतोष रावत, धानोरकर व धोटे गटाचे घनश्याम मुलचंदानी यांची नावे चर्चेत आहेत. मात्र या दोघांना मात देत काही महिन्यांपूर्वीच कॉग्रेस पक्षात प्रवेश घेणाऱ्या डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे नाव खुद्द प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच समोर केले आहे. डॉ. गावतुरे या प्रदेशाध्यक्ष पटोले यांची मानलेली भाची आहे अशीही चर्चा कॉग्रेसच्या वर्तुळात आहे. त्यामुळे वडेट्टीवार व धानोरकर-धोटे यांना डावलुन डॉ. अभिलाषा गावतुरे यांच्या गळ्यात कॉग्रेसच्या उमेदवारीची माळ पडण्याची शक्यता आहे.

डॉ. गावतुरे यांना उमेदवारी मिळाली तर कॉग्रेस पक्षात आरपारची लढाई होण्याची शक्यता अधिक आहे. त्याला कारण डॉ. गावतुरे या काही महिन्यांपूर्वीच पक्षात आलेल्या आहेत. कॉग्रेस पक्षात निष्ठावंतांना डावलुन उमेदवारी देण्याची परंपरा आहे. २०१९ मध्ये चोवीस तासापूर्वी पक्षात आलेले डॉ. विश्वास झाडे यांना कॉग्रेसने उमेदवारी दिली होती. डॉ. झाडे यांना उमेदवारी देतांना कशा प्रकारे अर्थपूर्ण व्यवहार झाले हे काही लपून राहिले नाही. त्यामुळे आता जर पून्हा प्रदेश पातळीवरून डॉ. गावतुरे यांच्या रूपाने उमेदवार लादल्या गेला तर कॉग्रेस पक्षात बंडाचा झेंडा फडकण्याची शक्यता अधिक आहे. २०१९ मध्ये मुनगंटीवार यांच्या विरूध्द लढलेले राजु झोडे यांनी चंद्रपूर व बल्लारपूर या दोन्ही विधानसभा मतदार संघातून कॉग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. झोडे यांना दोन पैकी एका ठिकाणाहून कॉग्रेसने उमेदवारी दिली नाही तर ते देखील अस्तीत्व दाखविण्यासाठी बंडाचा झेंडा फडकवू शकतात. यासोबतच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाश पाटील मारकवार, नंदू नागरकर, शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष संदिप गिऱ्हे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे राजेंद्र वैद्य यांच्यासह किमान बावीस उमेदवार बल्लारपूर मतदार संघातून निवडणुक लढण्यासाठी इच्छुक आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये