Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

रोटरी क्लब वरोराचा पदग्रहण सोहळा संपन्न

अध्यक्षपदी देऊळकर तर सचिवपदी मणियार यांची निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

  सन २०२४ -२५ साठी रोटरी क्लब ऑफ वरोरा चा नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा गोंडवाना विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा रोटे. डॉ. विजय आईंचवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच कटारिया मंगल कार्यालयात पार पडला.

        व्यासपीठावर विशेष अतिथी म्हणून चंद्रपूर – आर्णी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रतिभा धानोरकर, सहप्रांतपाल अरुण कावडकर, पी.ए.जी डिस्ट्रिक्ट ३०३० रोटे. समीर बारई, नितेश जयस्वाल, रोटरी क्लब वरोऱ्याचे अध्यक्ष बंडू देऊळकर, सचिव अभिजित मणियार, माजी अध्यक्ष डॉ.सागर वझे, माजी सचिव मधुकर फुलझेले , इनरव्हील क्लब वरोऱ्याची अध्यक्षा दिपाली माटे रोटे. मनोज कोहळे, रोट्रॅक्टचे अध्यक्ष हिमांशू केशवाणी इ. प्रामुख्याने उपस्थित होते.

      डॉ. आईंचवार म्हणाले की, समाजसेवेला समर्पित रोटरी क्लबच्या माध्यमातून विश्वात अनेकविध प्रकल्प राबविण्यात येतात त्याच प्रकारे रोटरी क्लब तर्फे अधिक समाज उपयोगी प्रकल्प राबवावे आणि या कार्यात भर घालण्यासाठी “मी” ऐवजी “आम्ही” या सांघिक भावनेने कार्य करणे महत्त्वाचे ठरते.

      खा. धानोरकर म्हणाल्या की, कोणाच्या सुखात सहभागी नाही झाले तरी चालेल पण दुःखात अवश्य सहभागी झाले पाहिजे. त्यांनी रोटरीच्या समाजसेवेशी जुडलेल्या कार्याविषयी गौरवोद्गार काढले.

   मावळते अध्यक्ष डॉ.वझे यांनी आपले अनुभव कथन केले व पुढील सत्रात ही रचनात्मक व क्रियाशीलतेने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

   नवनियुक्त अध्यक्ष देऊळकर यांनी सत्र २०२४ – २५ साठी स्वनिर्धारीत लक्ष्याविषयी माहिती देत सांगितले की, सदस्यांच्या उर्जा आणि अनुभवाच्या समन्वयातून क्लब नवी उंची गाठेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

   तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. रोटरी क्लबच्या नेतृत्व बदलाच्या वार्षिक परंपरेनुसार रोटरी क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न झाला. नूतन अध्यक्ष बंडू देऊळकर यांनी डॉ.सागर वझे यांच्याकडून अध्यक्षपदाची, अभिजित मणियार यांनी मधुकर फुलझेले यांच्याकडून सचिवपदाची तर दामोदर भासपले यांनी मनोज कोहळे यांच्याकडून कोषाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. नूतन कार्यकारणी मध्ये सह सदस्य अमित नाहर, योगेश डोंगरावर, राहुल पावडे, होजेफा अली, सचिन जीवतोडे, डॉ. विवेक तेला, रवी शिंदे यांचा समावेश करण्यात आला. कार्यक्रमात नवीन पदाधिकारी यांना पिन व कॉलर घालून त्याच्या पदाची सूत्रे सुपूर्द करण्यात आली.

        प्रास्ताविक व सूत्रसंचालन होजैफा अली यांनी केले तर आभार प्रदर्शन नवनियुक्त सचिव अभिजित मणियार यांनी केले.

    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोटेरियन, इनरव्हील, रोट्रॅक्ट क्लब ऑफ वरोरा पदाधिकारी, सदस्य इ.ने योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये