Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाचा दणका  

३ चालु बांधकामे जमीनदोस्त

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर – ब्लू लाईन मधील अवैध बांधकामांना मनपाने दणका दिला असुन पूररेषेतील ३ चालुस्थितीतील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहे. अवैधरितीने उभारण्यात आलेले अर्धस्थितीतील पिलर व भिंतींचे बांधकाम तोडण्याची कारवाई मनपामार्फत करण्यात आली आहे.

    अमृतसर हवेली हॉटेलमागे,आंबेडकर सभागृहाजवळ मौजा वडगाव सर्वे नंबर ८ व ९ असलेल्या भूखंडावर अनधिकृत बांधकाम केले असल्याचे मनपा पथकास पाहणीदरम्यान आढळले. सदर भूखंड हा ब्लू लाईन मध्ये असल्याने यावर कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्री करता येत नाही. यासंबंधी महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियमाच्या कलम ५२अन्वये अनधिकृत बांधकाम करणाऱ्या या सर्व बांधकामदारांना नोटीस देण्यात आली होती. मात्र विहीत मुदतीत अतिक्रमण न हटविल्याने सदर कारवाई करण्यात आलेली आहे.

    पुराचा संभाव्य धोका टाळण्यासाठी पूररेषेच्या आत कोणतेही बांधकाम व्हायला नको, नदी किनारी असलेली बांधकामे, अतिक्रमणे, नदीपात्रातील काँक्रीटीकरण यामुळेे पुराची पातळी वाढत जाण्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. मा.हायकोर्टात दाखल झालेल्या जनहित याचिकेच्या अनुषंगाने पूररेषेतील अतिक्रमणे काढण्यात यावी असे निर्देश मा.न्यायालयाने दिलेले असल्याने सदर बांधकामांवर कारवाई करण्यात येत आहे.

   सदर कारवाई आयुक्त विपीन पालीवाल यांच्या मार्गदर्शनात व उपायुक्त रवींद्र भेलावे यांच्या प्रत्यक्ष नियंत्रणात सहायक आयुक्त संतोष गर्गेलवार,सहायक नगररचनाकार सारिका शिरभाते,अतिक्रमण पथकाद्वारे करण्यात आली. झोन क्र. १ प्रभागातील पूरग्रस्त भागात येणाऱ्या राष्ट्रवादी नगर परिसर,तुळशी नगर,आंबेडकर सभागृह परिसर,वडगाव जुनी वस्ती,सोमय्या पॉलीटेक्नीक,हवेली गार्डन,जगन्नाथ बाबा नगर,अग्रेसन भवन मागील परिसर,वक्रतुंड चौक,सिस्टर कॉलोनी, रहमत नगर, शांतीधाम मागील परिसर इत्यादी भागात पूररेषेत बांधकाम करणाऱ्या नागरिकांना मनपातर्फे नोटीस देण्यात आल्या आहेत. सदर बांधकामे बांधकामदारांनी तात्काळ निष्कासित करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

    त्याचप्रमाणे केवळ नोटरीच्या आधारे कुठल्याही स्वरूपाची खरेदी विक्रीची कारवाई करू नये भविष्यात यासंबंधी कुठल्याही संशय उद्भवल्यास याची जबाबदारी पुर्णपणे विक्री करून देणार व विक्री करून घेणार यांची राहील. दुय्यम निबंधक कार्यालयातून नोंदणी होत असलेल्या भूखंडाचीच खरेदी अथवा विक्री करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये