एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या बल्लारपूर आवारात डिजिटल साक्षरता व सॉफ्टवेअर प्रशिक्षण कार्यशाळा संपन्न
बदलत्या शैक्षणिक गरजांसाठी शिक्षकांचा डिजिटल लिटरसीद्वारे सशक्तीकरण आवश्यक– डॉ. मंजुषा काणडे

चांदा ब्लास्ट
एसएनडीटी महिला विद्यापीठ, मुंबई चे महर्षी कर्वे महिला सक्षमीकरण ज्ञानसंकुल बल्लारपूर येथे दिनांक ३० जुलै २०२५ रोजी “पी.एम.-उषा (मेरु)” प्रकल्पांतर्गत डिजिटल लिटरसी सेंटर – ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर ट्रेनिंग या एक दिवसीय लघु अभ्यासक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी दीपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे डॉ. मंजुषा कानडे, डॉ. प्रांजल बोगावार, बल्लारपूर आवाराचे संचालक डॉ. राजेश इंगोले, सहायक कुलसचिव डॉ. बाळू राठोड, तसेच समन्वयक डॉ. वेदानंद अलमस्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. वेदानंद अलमस्त यांनी केले व अध्यक्षीय भाषण डॉ. राजेश इंगोले यांनी केले त्यांनी शिक्षण क्षेत्रातील सतत होणारे बदल आणि शिक्षकांनी नवतंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज या मुद्द्यावर सविस्तर प्रकाश टाकला यावेळी डॉ. मंजुषा कानडे यांनी शिक्षणपद्धती, शिक्षकाची भूमिका व बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगातील नवविचार यावर भाष्य केले.
कार्यक्रमात तीन शैक्षणिक सत्रे घेण्यात आली. पहिल्या सत्रात प्रियांदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील इलेक्ट्रॉनिक्स व टेलिकम्युनिकेशनचे विभागप्रमुख डॉ. विशाल पांचभाई , यांनी मायक्रोसॉफ्ट ऑफिस, वर्ड, एक्सेल, पॉवरपॉईंट यावर सविस्तर माहिती व प्रात्यक्षिके सादर केली.
दुसऱ्या सत्रात शैक्षणिक, व्यवस्थापन परिषद सदस्य, एसएनडीटी महिला विद्यापीठ मुंबई , तथा प्राचार्य डॉ. प्रांजल बोगावार यांनी शिक्षण व संशोधनासाठी उपयुक्त विविध डिजिटल साधनांवर मार्गदर्शन केले. यात गूगल वर्कस्पेस, ऑनलाइन मीटिंग टूल्स, स्क्रीन रेकॉर्डिंग सॉफ्टवेअर, लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम्स, रेफरन्स मॅनेजमेंट टूल्स, शोधनिबंध साधने व साहित्य चोरी तपासणी उपकरणांचा समावेश होता. तिसऱ्या सत्रात प्रियांदर्शिनी अभियांत्रिकी महाविद्यालय, नागपूर येथील उपप्राचार्य डॉ. गजेन्द्र आसुटकर यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि त्याचे शिक्षणासाठीचे उपयोग यावर सखोल माहिती दिली. त्यांनी चॅटजीपीटी, गूगल जेमिनी, बिंग कोपायलट, क्लॉड, डिफिट, क्युरिपॉड, मॅजिक स्कूल या साधनांचा अभ्यास करून वेगवेगळ्या पद्धतीचे अध्यापन साहित्य, प्रश्नपत्रिका व मूल्यमापनासाठी त्याचा वापर कसा करावा हे स्पष्ट केले.
कार्यक्रमाची सांगता सहभागी प्राध्यापकांच्या अभिप्रायाने झाली. उपस्थित सर्व प्राध्यापकांनी कार्यशाळेबाबत सकारात्मक अनुभव मांडले. यानंतर सहभागी प्राध्यापकांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहा. प्रा. शीतल बिल्लोरे, सहा. प्रा. अपेक्षा पिंपळे, सहा. प्रा. पायल तापासे, सहा. प्रा. कोमल भाटिया व सहा. प्रा. प्रनाली गौरकर यांनी संयोजन समितीच्या सदस्य म्हणून महत्वाची भूमिका बजावली, आभारप्रदर्शन सहा. प्रा. ऋग्वेद खंगमपट्टीवार यांनी केले.