घुग्घुसमध्ये दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन

चांदा ब्लास्ट
घुग्घुस, चंद्रपूर : येथील बौद्ध सर्कल समिती व नवबौद्ध स्मारक तथा बहुउद्देशीय समितीच्या वतीने बोधिसत्व, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या वर्धापन दिनानिमित्त तसेच भारतीय संविधानाच्या रौप्य महोत्सव दिनाच्या औचित्याने दिनांक २६ व २७ जानेवारी रोजी दोन दिवसीय भव्य धम्म संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे संमेलन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसर, घुग्घुस येथे होणार आहे.
२६ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता प्रथम सत्रात धम्म संमेलनाचे उद्घाटन व धम्मदेशना होणार आहे. द्वितीय सत्रात भारतीय संविधानावर येणारी आव्हाने व त्यांचे घटनात्मक मार्गाने निराकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मातृ संघटनासाठी असलेले योगदान, सद्यस्थिती व उपाय, बहुजन चळवळीसमोरील आव्हाने व त्यावरील उपाय या विषयांवर विचारमंथन होणार आहे. याच दिवशी मातोश्री रमाई यांचे एकांकिका नाटक “मी रमाई बोलते” सादर करण्यात येणार आहे.
२७ जानेवारी रोजी सकाळी ११:३० वाजता प्रथम सत्रात उद्घाटक व प्रमुख पाहुण्यांचे आगमन होईल. यावेळी प्रथम नगराध्यक्षा यांचा सत्कार तसेच नवनियुक्त नगरसेवकांचा सत्कार करण्यात येणार आहे. द्वितीय सत्रात डॉ. बाबासाहेबांनी महिलांना दिलेले अधिकार, आजच्या महिलांची स्थिती व उपाय, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची धम्म चळवळ, स्त्रीमुक्तीचा विचार व आजच्या काळातील परिस्थिती या विषयांवर व्याख्याने होणार आहेत.
सायंकाळी ४ वाजता तिसऱ्या सत्रात कल्याणकारी राज्यांच्या संकल्पनेसमोरील सत्ताधाऱ्यांची आव्हाने व उपाय, भारतीय संविधानाची निर्मिती आणि फुले–शाहू–आंबेडकरी विचार, संघर्ष व दिशा यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
याशिवाय २६ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता सुप्रसिद्ध विनोदी प्रबोधनकारांचा कार्यक्रम तर २७ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता प्रख्यात प्रबोधनकारांचा जल्लोष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या दोन दिवसीय धम्म संमेलनास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.



