Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रा.पं.प्रशासनाच्या हेतूपरस्पर दुर्लक्षाने चार गावे विविध समस्यांच्या विळख्यात

समस्या मार्गी लावा अन्यथा गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती : तालुक्यातील तेलंगणा सीमेलगत असलेल्या येल्लापुर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेली येल्लापुर, येल्लापुर (खु), गोंडगुडा कोलामगुडा ही चार गावे ग्रा.पं.प्रशासनाच्या हेतूपरस्पर दुर्लक्षामुळे समस्यांच्या विळख्यात अडकली असून गावकऱ्यांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. येल्लापुर येथील पंचशील बौद्ध विहार ते बाबासाहेब जोंधळे यांचे घराकडे जाणारा रस्ता चिखलमय झाला असून बौद्ध विहाराजवळ चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. तलावाखालील पिण्याच्या पाण्याच्या विहिरीकडे जाणारा रस्ता, स्मशान भूमीकडे जाणारा रस्ता, येल्लापूर (खु) येथील हातपंपा जवळून शाळेकडे जाणारा रस्ता या सर्वांची पावसाळ्याच्या दिवसात हीच अवस्था आहे. येल्लापूर, येल्लापुर (खु) येथील हातपंपाचे पाणी सांडपाणी व्यवस्थापनाअभावी रस्त्यावर पसरून घाण निर्माण झाली आहे. गावातील गवतही कापण्यात आले नसून गावातील नालीसफाई देखील करण्यात आली नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

       जि.प.शाळेजवळील विहीर कोसळून दोन वर्षांच्यावर कालावधी लोटूनही अद्याप दुरुस्ती करण्यात आली नाही. या विहिरीतील पाण्याचा वापर गावकरी करतात. दुर्दैवी घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षांपूर्वीपासून जलस्वराज्य प्रकल्प अंतर्गत सुरू असलेली पाणीपुरवठा बंद असून जलजीवन मिशनचे कामही अर्धवट आहे. तरी ग्रा.पं. मार्फत विशेष पाणीकराच्या नोटिसा बजावण्यात आल्यात. जि.प.शाळेच्या तीन इमारती व अंगणवाडीची इमारत जीर्ण झाली असून त्या केव्हाही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. मात्र, त्याच इमारतीत अद्यापही चिमुकले धडे गिरवत आहेत. शाळेत पिण्याच्या पाण्याची सोय नाही. मुलींसाठी शौचालय देखील नाही. संरक्षण भिंत नाही, रंगरंगोटी देखील करण्यात आली नाही. गावात अपवादात्मक ठिकाण वगळता पथदिवे नाहीत यासह अनेक समस्यांचे निवेदन येल्लापूर येथील ग्राम पंचायत सदस्य, तंटा मुक्त अध्यक्ष यासह १०३ नागरिकांनी जिल्हाधिकारी व मुख्यकार्यकारी यांना दिले आहे.

       ग्रामसेविका हप्त्यातून एक ते दोन दिवसच ग्रा.पं.ला येतात.गावातील समस्यांविषयी विचारणा करायला गेलेल्या नागरिकांना तुमचं गावच खूप खराब आहे, इथे कोणी काम करायला येत नाही, तुम्हाला काय समजते अशी उद्धटपणाने उडवाउडवीची उत्तरे देतात. तसेच सरपंच व उपसरपंच यांच्या नातेवाईकांचा कामाच्या कमिशनच्या लोभापायी ग्रामसेविका यांनी ग्राम पंचायतच्या कामकाजात हस्तक्षेप वाढविला आहे.त्यामुळे गावाच्या विकासाला खीळ बसली आहे. तसेच मागील तीन वर्षांपासून विकासकामांच्या नावाखाली निकृष्ट दर्जाची कामे झाली आहेत. त्या सर्वांची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. गावातील समस्या दूर नाही झाल्यास गावकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये