देऊळगाव राजा येथील मुख्य बाजारपेठेतील 5 दुकाने जळून खाक
1 कोटी 52 लाख रुपयांचे नुकसान

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
देऊळगाव राजा शहरातील चिखली रोड वरील संतोष चित्रमंदिर परिसरात शुक्रवारी सकाळी दहा च्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीत पाच दुकाने जळून खाक झाली, तर शेजारच्या 4 दुकानांना आगीची झळ पोहचून मोठे नुकसान झाले आहे.
या भीषण आगीत सुमारे एक कोटी 52 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्ग वर असलेल्या एका दुकानातून धुराचे मोठे लोट उठू लागल्यानंतर आगीने उग्र रूप धारण केले. आइस्क्रीम, किराणा, इलेक्ट्रिक, हेअर कटिंग ची दुकाने जळून खाक झाली. उन्हाची तीव्रता व दुकानातील ज्वालाग्राही साहित्यामुळे आग वेगाने पसरली,
आगीच्या घटने ची माहिती मिळताच नगर परिषद चे तसेच जालना येथील अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले व आगीवर नियंत्रण मिळविले . अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला.
या आगीत अशोक वाघ यांच्या हेयर सलून चे 8 लाख रुपयांचे,अशोक आगेवाल यांच्या भरकादेवी आइस्क्रीम दुकानाचे 10 लाख रुपयांचे, आशिष निमोदिया यांच्या व्यंकटेश किराणा दुकान चे 60 लाख रुपयांचे, दिलीप निमोदिया यांच्या किराणा दुकान चे 45 लाख रुपयांचे, तर रमेश तिडके यांच्या इलेक्ट्रिक दुकानाचे 10 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्ट झाले आहे, याशिवाय आगीची झळ पोहचू नये यासाठी जे सी बी च्या सहाय्याने दुकाने तोडल्यामुळे आतिश कुसळे यांच्या दुकानाचे 8. लाख रुपयांचे, सुनील भुतेकर यांच्या मेडिकल दुकानाचे 3. लाख रुपयांचे, यश पिंपळे यांच्या दुकानाचे 4 लाख रुपयांचे, तर प्रमिला भुतेकर यांच्या दुकानाचे 4 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले आहे.
घटनास्थळी उप विभागीय अधिकारी प्रा संजय खडसे, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, मुख्याधिकारी अरुण मोकळ, ठाणेदार ब्रह्मा गिरी यांनी भेट देऊन सूचना दिल्या,
घटनेची माहिती मिळताच आमदार मनोज कायंदे यांनी घटनास्थळी धाव घेत तातडीने पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले, तसेच नुकसानग्रस व्यापाऱ्यांना शासनाकडून आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील असे त्यांनी सांगितले.



