ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सामाजिक ज्ञान स्पर्धेला ६०० विद्यार्थ्यांचा सहभाग
बहुजन मेडीकोज असोसिएशन आणि ओबीसी सेवा संघ यांचे आयोजन

चांदा ब्लास्ट
बहुजन मेडीकोज असोसिएशन आणि ओबीसी सेवा संघ चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले आणि मां फातिमा शेख यांच्या जयंतीनिमित्त खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा शनिवार, ६ जानेवारी २०२४ रोजी मातोश्री विद्यालय तुकुम, चंद्रपूर येथे संपन्न झाली. या स्पर्धेला राज्यभरातून तब्बल ६०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
खुली सामाजिक ज्ञान स्पर्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित जातीव्यवस्थेचे निर्मूलन, कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता आणि महात्मा ज्योतिबा फुले लिखित शेतकऱ्यांचा आसूड या तीन पुस्तकावर घेण्यात आली. या स्पर्धेचा निकाल रविवार, दि. १४ जानेवारी २०२४ रोजी घोषीत होणार आहे. स्पर्धेसाठी अनुक्रमे प्रथम बक्षीस १०,०००/- रुपये रोख, द्वितीय बक्षीस ७,०००/- रुपये, तृतीय बक्षीस ५,०००/- रुपये आणि एकूण २० प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात येणार आहेत.
वाचन संस्कृती जोपासण्यासाठी आणि महापुरुषांचे विचार आजच्या तरुण पिढीमध्ये पोहचविण्यासाठी सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच आजची तरुण पिढी वाचनापासून दूर होत असल्याचे चित्र दिवसेंदिवस समाजामध्ये वाढत आहे. त्यामुळे अशा स्पर्धेच्या माध्यमातून वाचन संस्कृती बळकट होते. असे मत स्पर्धेचे मुख्य आयोजक डॉ. विवेक बांबोळे यांनी व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बहुजन मेडीकोज असोसिएशनचे डॉ. विवेक बांबोळे, गोंडवन शिक्षण प्रसारक मंडळाचे प्रा. सुर्यकांत खनके, ओबीसी सेवा संघांचे प्रा. अनिल डहाके, विचारज्योत फाऊंडेशनचे सुरज पी. दहागावकर, विशाल शेंडे, प्रलय म्हशाखेत्री, मातोश्री विद्यालयाचे शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.