Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

नुकसानग्रस्त घरांचे व शेतीचे पंचनामे करण्याचे निर्देश

जिल्ह्यात पावसाची संततधार, नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

चांदा ब्लास्ट

नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने दिनांक 19 व 20 रोजी मिळालेल्या रेड अलर्ट नंतर जिल्हा प्रशासनाने संपूर्ण जिल्ह्यांच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले होते. दिनांक 19 व 20 जुलै रोजी पडलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 500 ते 600 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे, तसेच जिल्ह्यातील मुख्य मार्ग नागभीड – नागपूर हायवे पुराच्या पाण्यामुळे बंद पडला होता. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतर मार्ग जे पावसाच्या पाण्यामुळे बंद पडले होते, ते पाण्याचा प्रवाह कमी झाल्यानंतर मार्ग मोकळे झाले आहेत. घरांचे नुकसान तसेच शेताचे नुकसान यांना मदत कार्यासाठी शासनाच्या आदेशानुसार जिल्हा प्रशासनाने संबंधित तहसीलदार तसेच कृषी अधिकारी यांना पंचनामा करण्यासाठी निर्देश देण्यात आले आहेत.

19 व 20 रोजी झालेल्या पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील एका घराची भिंत पडल्यामुळे पाच लोक जखमी झाले, यांच्यावर ग्रामीण रुग्णालय येथे उपचार चालू आहे. नागभीड तालुक्यातील विलंब या गावचा रहिवासी असलेला 8 ते 10 वर्षाचा रोनाल्ड पावणे हा मुलगा विलंब रोडवरील नाल्यावरून वाहून गेला आहे. त्याच्या शोध मोहिमेकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन शोध बचाव पथकाला पाठवण्यात आले आहे. तसेच नागभीड तालुक्यातील मौजे बोथली येथील नाल्यात 30 वर्षाचा इसम स्वप्निल दोनोडे हा बुडून मृत पावला आहे. त्याचा मृतदेह स्थानिक शोध बचाव पथकाच्या मदतीने मिळाला असून पुढील कार्यवाहीकरीता नागभीड पोलीस विभागाकडे सोपवण्यात आले आहे.

जिल्हा प्रशासनाचे आवाहन : गत 24 तासापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून पुढील दोन – तीन दिवस सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी पूर परिस्थितीत योग्य काळजी घ्यावी. तसेच मदतीकरीता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षाच्या 07172-250077 आणि 07172-272480 या क्रमांकावर संपर्क करावा. तसेच पूर परिस्थितीत नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी केले आहे.

गत 24 तासात जिल्ह्यात झालेला पाऊस : गत 24 तासात चंद्रपूर तालुक्यात 32.7 मिमी. पाऊस, मूल 64.7 मिमी., गोंडपिपरी 23.5 मिमी., वरोरा 47.4 मिमी., भद्रावती 28.6 मिमी., चिमूर 107.1 मिमी., ब्रम्हपूरी 190.1 मिमी., नागभीड 120 मिमी., सिंदेवाही 102.4 मिमी., राजुरा 27.6 मिमी., कोरपना 18.4 मिमी., सावली 68.6 मिमी., बल्लारपूर 30.5 मिमी., पोंभुर्णा 20.3 मिमी., आणि जिवती तालुक्यात 19.4 मिमी. पावसाची नोंद करण्यात आली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये