Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

प्रसुतीगृह की जलतरण तलाव? – उपजिल्हा रुग्णालयात गटाराच्या पाण्याचा तलाव

प्रभारी वैद्यकीय अधिक्षक रुग्णालयात फिरकलेच नाही - नवजात बालकांचे आरोग्यच नाही तर उपजिल्हा रुग्णालयच व्हेंटिलेटरवर

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

रुग्णालय हा शब्दच आयुष्यात नसावा आपण सर्वच कायम निरोगी असावे असे प्रत्येकाला वाटत असते मात्र तरीही प्रत्येकाला रुग्णालयात कधी ना कधी जावेच लागते. रुग्णालय म्हंटले की आजारपण आणि त्यामुळे प्रकृतीत येणारी नाजुकता त्यामुळे रुग्णालय स्वच्छ नीटनेटके असावे ही अपेक्षा असते आणि जर का रुग्णालयात पावसामुळे चक्क गटाराचे पाणी सर्वत्र वाहत असेल तर? त्यातही अत्यंत नाजुक प्रकृती असलेल्या गर्भवती स्त्रियांच्या, नवजात बालकांच्या कक्षात आणि प्रसुती गृहात अशी स्थिती निर्माण झाल्यास त्या ठिकाणची संपुर्ण आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटर वर गेल्याचे खेदाने म्हणावे लागते.

असाच प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथिल उपजिल्हा रुग्णालयात उघडकीस आला असुन रुग्णालय प्रशासनाचे वाभाडे निघाले आहे. राजुरा येथे रविवार दिनांक 14 जुलै रोजी सायंकाळी अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. जवळपास तासभर झालेल्या ह्या पावसाने राजुरा उपजिल्हा रुग्णालयाच्या व्यवस्थेचे पोस्टमॉर्टम झाले आहे.

राजुरा उपजिल्हा रुग्णालयाच्या जुन्या इमारतीत प्रसुती व नवजात शिशु विभाग आहे. सायंकाळी झालेल्या पावसाने प्रसुती कक्षाच्या शौचालयाच्या मोरीतून गटाराचे तसेच पावसाचे पाणी प्रसुती कक्षात शिरले. प्रसुती कक्षात हे दुषित पाणी जवळपास 4 इंचापर्यंत साचले होते. त्यानंतर हे पाणी प्रसुती कक्षाबाहेरील कॉरीडोर मधे साचले. ह्या पाण्यात अक्षरशः गटारातील किडे सुद्धा आढळुन आले.

हा प्रकार कळताच चांदा ब्लास्ट प्रतिनिधीने तातडीने रुग्णालयाकडे धाव घेऊन शहनिशा केली असता त्या ठिकाणची भिषण दुरवस्था व वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनास्था अनुभवायला मिळाली. असाच प्रकार चार दिवसांपूर्वी झालेल्या पावसाच्या वेळीही घडल्याचे कळले आहे हे विशेष. प्रस्तुत प्रतिनिधी घटनस्थळी असताना कुठलेही वैद्यकीय अधिकारी पाणी साचलेल्या ठिकाणी उपस्थित नव्हते. राजुरा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक रजेवर असल्याने डॉ. गोनपल्लीवार यांचेकडे रुग्णालयाचा प्रभार सोपविण्यात आला होता मात्र ते देखिल रुग्णालयात उपस्थित नव्हते त्यामुळे प्रस्तुत प्रतिनिधीने त्यांना तब्बल सहा वेळा भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र डॉ. गोनपल्लीवार ह्यांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही. प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांच्या ह्या वागणुकीमुळे राजुरा विभागाची संपुर्ण आरोग्य व्यवस्थाच व्हेंटिलेटरवर गेल्याचे दिसुन येत आहे.

प्रसुती गृहात चार इंच पाणी साचले असतानाच एखाद्या महिलेला तत्काळ प्रसुती करण्याची आवश्यकता भासल्यास त्या मातेची प्रसुती कुठे होणार? गटाराचे पाणी साचले असल्याने त्यातून येणारी दुर्गंधी, रोगराई ह्यामुळे त्या मातेला अथवा नवजात अर्भकाला कुठलाही संसर्ग झाल्यास जबाबदारी कुणाची? कारण वैद्यकीय अधीक्षक तर फोन घेण्यासही बांधील नसल्याचे दर्शवत आहेत त्यामुळे त्या निष्पाप जीवांचे आयुष्य रामभरोसे असल्याचे निदर्शनास येत असुन ह्याकडे वरिष्ठ अधिकारी कोणत्या दृष्टिकोनातून बघतात व संबंधित बेजबाबदार अधिकाऱ्यांवर काय कारवाई करतात ह्याकडे रुग्णांस जनतेचे लक्ष लागले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये