ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘कस्टोडियल डेथ’ मुळे वरोरा पोलीस दलात खळबळ

राज्य सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने

वरोरा : खून तथा बलात्कार प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी समाधान माळीने रविवारी वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये स्वतःच्या बुटातील लेसच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. ‘कस्टोडियल डेथ’ मुळे वरोरा पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणात निष्काळजीपणाचा ठपका ठेवून दोन पोलिस कर्मचार्‍यांवर निलंबनाची कार्यवाही व या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

      पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार २६ जून रोजी वरोरा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आनंदवन येथे आरती (२४ वर्षे) नामक एका महिलेचा खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या प्रकरणाचा अधिक तपास करीत असतांना दोन – तीन संशयितांवर पोलिसांनी नजर ठेवली. यातील एका संशयिताला (समाधान माळी, वय – २५ वर्षे) २७ जून रोजी ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने सांगितले की, आनंदवनातील आरती नामक महिलेशी प्रेम होते. तिच्याशी लग्नही करण्याची तयारी होती परंतु काही दिवसांपासून तिचा कल दुसरीकडे होता. यामुळे दुखावून २६ जून रोजी आरतीचे आई – वडील औषधोपचारासाठी बाहेर गावी गेल्याची संधी साधून तिचा खून केल्याची कबुली आरोपीने दिली. कबुली नंतर त्यांच्यावर खूनाचा गुन्हा नोंदविण्यात आला. दुसऱ्या दिवशी कोर्टात हजर केल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

याबाबत आरोपीबद्दल अधिक विचारपूस केली असता चाकूने महिलेचा गळा चिरून खून करण्यापूर्वी संबंधित महिलेवर बलात्कार केल्याची कबुली त्याने दिली. खुनासाठी काही महिन्यांपूर्वीच फ्लिपकार्टवर चाकू खरेदी केल्याचेही त्यांनी सांगितले. केलेल्या घटनांचा आता मला पश्चात्ताप होत आहे, माझ्या हातून मोठी चूक झाली,असे मान्य करीत आरोपी रडत होता, असे पोलिसांचे म्हणणे आहे. आरोपीच्या कबुली जबाबानंतर प्रथमतः खून मग बलात्काराचा गुन्हा आरोपींवर नोंदविण्यात आला होता. शनिवारी रात्री आरोपीची रुग्णालयात तपासणी करण्यात आली होती. आरोपीची मनस्थिती चांगली नसल्याने तो पळूनही जाऊ शकतो, काहीही करु शकतो, या बाबत यंत्रणेला अलर्ट करण्यात आले होते. तथापि असे कळते की, दुसऱ्या दिवशी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान ड्युटीवर आलेल्या सफाई कामगाराला असे आढळले की, आरोपी समाधान माळी याने पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे आणि त्याने स्वतःच्या बुटाच्या लेसला बाथरूम मध्ये असलेल्या पट्टीला बांधले आणि बसलेल्या स्थितीत गळफास घेऊन आत्महत्या केली . सदर माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि पोलीस दलात एकच खळबळ उडाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि याप्रकरणी चौकशी सुरू केली.

मॅजिस्टेट ने पोलीस स्टेशनची चौकशी केली. घटनांची योग्य व्हिडीओग्राफी/ फोटोग्राफी वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत प्रक्रियेनुसार करण्यात आली तसेच याप्रकरणाची दंडाधिकारी यांनी सखोल चौकशीदेखील केली. यावेळी श्वान पथक, फारेन्सिक टिमला देखील पाचारण करण्यात आले होते. राज्य सीआयडी या प्रकरणाचा तपास करणार आहे. तत्पूर्वी या तपासणीचा अहवाल संबधितांना पाठविण्यात आला आहे. सदरहू आत्महत्येची संपूर्ण घटना पोलीस ठाण्याच्या कॅमेऱ्यात बंद झाली आहे. ‘इन कॅमेरा’ देखरेखीखाली जिल्हा शल्य चिकित्सक, चंद्रपूर येथे शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी सांगितले.

   आरोपीला होती क्राईम सिरियल पाहण्याची सवय

     समाधान माळी हा मुळत: जळगाव जिल्ह्यातील असून तो आनंदवनात औषधोपचारासाठी एक दीड वर्षापूर्वी आला होता. इथे तो आरतीच्या प्रेमात पडला. तो स्वभावाने रागीट पण हुशार होता असे बोलल्या जात आहे. टिव्हीवर दाखविल्या जाणाऱ्या ‘क्राईम पेट्रोल’, ‘सीआयडी’ आदी सिरियल तो आवर्जून बघायचा. त्याला त्या सिरियल आवडायच्या त्यामुळे तो त्याच्या आहारीच गेला होता. हे प्रकरण या सिरियलच्या प्रभावामुळेच घडले असावे, असे बोलल्या जात आहे. आत्महत्येचे कारण अज्ञात असले तरी आरतीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याने आजन्म कारावास किंवा फाशीची शिक्षा सुनावली जाईल, याची कदाचित जाणीव झाल्याने त्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला असावा, असे बोलल्या जात आहे.

अबब! लेस ने गळफास, लोकांचा बसत नाही विश्वास

     वरोरा पोलीस स्टेशनच्या लॉकअप मध्ये समाधान माळी नामक आरोपीने गळफास घेण्यासाठी चक्क बुटाच्या लेस चार वापर केल्याचे म्हटले जाते. पोलीस कोठडीची अरुंद जागा, तेथील एकूणच व्यवस्था बघत लेस सारख्या साधनाचा वापर करून गळफास घेणे लोकांसाठी एक आश्चर्याची बाब म्हणजे’ आठवा अजूबा’ आहे. पोलीस कोठडीत झालेल्या आत्महत्येच्या घटनेबाबत अनेकांनी शंका व्यक्त केली आहे. वरोरा पोलीस स्टेशन मध्ये पहिल्यांदाच घडलेल्या या घटनेवर लोकांचा विश्वासच बसत नाही. या प्रकरणामुळे पोलीस विभागात खळबळ माजली असून विभागातील अनेक कर्मचाऱ्यांवर कारवाई ची टांगती तलवार लटकत असल्याचे कळते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये