Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीत खते व बियाणांची चढ्या दराने विक्री

चढ्या भावाने विक्री करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कारवाई करण्याची शेतकऱ्यांची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

डिलर कडून चढ्या दराने बियाणे कृषी केंद्रात पोहोचतात 

जिवती :- हा तालुका अतिदुर्गम व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखल जातो. येथील मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे आता शेतीचा हंगाम सुरू झाला आहे. शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे, शेतकरी कृषी दुकानांमध्ये पेरणीसाठी लागणारे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करतांना दिसत आहेत. अश्यातच जिवतीसह, तालुक्यातील बरेच कृषी केंद्रचालक बि- बियाने आणि रासायनिक खतांची चढ्या भावाने विक्री करत असल्याची तक्रार शेतकरी करत आहेत. तर जिवतीसह तालुक्यातील काही दुकानदार शेतकऱ्यांकडून मोठया प्रमाणात मागणी असलेल्या बियाणांची व खतांची चढ्या दराने विक्री करत असून कबड्डी, सुपरकॉट, राशी ६५९ यु. एस. ७०६७ या सारख्या अनेक वाणांचे ८६४ रुपयाचे पाकीट १२०० रुपयांपर्यंत विक्री होत असल्याचे समोर आले आहे.

शासनाने कपाशी बियाणांच्या पाकिटाची किंमत ८६४ रुपये ठरवली आहे. परंतु काही निवडक खाजगी कंपन्यांच्या वाणाला शेतकरी अधिक पसंती देत असल्याने या कंपन्याचे भाव डिलरच्या माध्यमातूनच वाढीव दराने कृषी केंद्रात पोहोचता केले जात आहे त्यामुळे चढ्या दराने उपलब्ध होणारी बियाणे शेतकऱ्यांना कृषी केंद्रातून अधिक दराने खरेदी करावी लागत आहे.एका पाकिटामागे ४०० ते ५०० रुपये जास्तीचे घेतल्या जात असल्याचे शेतकरी सांगत आहेत. खरीप हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांकडून पसंती असलेले बियाणे मिळत नसल्याने शेतकऱ्यांची धावपळ होत आहे. कृषी मार्केटमध्ये कबड्डी, सुपरकॉट, राशी ६५९ व यु.एस. ७०६७ या सारख्या अनेक वाणांची अधिक मागणी होत आहे.

मात्र हवे ते बियाणे शेतकऱ्यांना मिळत नसून कृषी केंद्रचालक मनमानी करत असल्याची शेतकऱ्यांची ओरड सुरू आहे.यावर आळा घालण्यासाठी प्रत्येक तालुक्यात प्रशासनामार्फत भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. परंतु संबंधित नेमलेली पथके फक्त कागदावरच असल्याचे चित्र तालुक्यात पाहायला मिळते. आर्थिकदृष्ट्या शेतकरी अगदी मेटाकुटीला आला असतानाच कृषी केंद्रचालकाकडून शेतकऱ्यांची मोठया प्रमाणात आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. तरी तालुका कृषी अधिकारी यांनी तालुक्यातील बि- बियाणे आणि चढ्या दराने रासायनिक खतांची विक्री करणाऱ्या दुकानदारावर भरारी पथकाद्वारे कारवाई करावी अन्यथा तालुक्यातील शेतकरी कृषी अधिकारी यांच्या कार्यालयाला टाळे ठोकल्याशिवाय राहणार नाहीत. असा इशाराही यावेळी तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिला आहे.

◆ जे पाहिजे ते मिळत नाही

या वर्षी तालुक्यात मागणी असलेल्या बियाणांचा तुटवडा पडला की जाणीव पूर्वक पाडला आहे, हा संशोधनाचा विषय आहे. काही कृषी केंद्रामध्ये पाहिजे तेच बियाणे मिळत नाही आहे. शेतकऱ्यांना ज्या औषध, खत व बियाणांचा अनुभव आहे तेच नेमके मिळत नाही शेतकऱ्यांना त्यांच्या विश्वासाचे बियाणे मिळत नाही मिळालेच तर त्याची जास्त किंमत मोजावी लागत आहे.

             माधव चव्हाण, शेतकरी देवलागुडा

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये