ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा बसस्थानकात बे-शिस्तपणाचा कळस!

राष्ट्रवादीचे (शरदचंद्र पवार) विभागीय व्यवस्थापकांना निवेदन 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

     येथील बस स्थानकात वाहतूक नियंत्रकांचा नियोजन शून्य कारभारामुळे व बस चालकांच्या हेकेखोरपणामुळे बस स्थानकात बे-शिस्तपणाचा कळस गाठला आहे. तसेच बस स्थानकातील अर्धवट कामामुळे प्रवाशांना सुविधेचा अभाव आहे. बस स्थानकात तात्काळ योग्य त्या सुविधा उपलब्ध करून, बे शिस्तीत बस लावणाऱ्या चालकांवर कारवाई करा, अन्यथा येत्या आठ दिवसात तीव्र स्वरूपाची आंदोलन छेडू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पकक्षाच्या (शरदचंद्र पवार) वतीने विभागीय व्यवस्थापक परिवहन महामंडळ बुलढाणा यांना देण्यात आला आहे.

            राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरदचंद्र पवार) पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदन नमूद आहे की, २०१८ मध्ये देऊळगाव राजा बसस्थानकाच्या नवीन इमारतीच्या बांधकामास सुरुवात झाली. यासाठी सुमारे साडेतीन कोटी रुपयांची तरतूदही करण्यात आली होती. यामध्ये बसस्थानकाची अद्यावत इमारत, ८ प्लॅटफॉर्म (फलाट), पोलिस चौकी,महिला व पुरुषांसाठी अलग-अलग स्वच्छतागृह, मोकळ्या जागेत सौंदर्यीकरण, प्रवाशांसाठी पंखे, सीसीटीव्ही कॅमेरे, ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धकाची व्यवस्था, दिवस व रात्रपाळीसाठी वेगवेगळे रखवालदार, वाहतूक नियंत्रकासाठी मदतनीस यासह इतरही अनेक बाबींची तरतूद करण्यात आली होती.मात्र बसस्थानकाचे काम अर्धवट अवस्थेत असतांनाच वर्षभरापूर्वीच हे बसस्थानक हस्तांतरित करुन घेण्याची घाई महामंडळाला का झाली? हा एक संशोधनाचा विषय आहे. कारण सद्य:स्थितीत या बसस्थानकावर यापैकी एकही गोष्ट उपलब्ध नाही.महिला व पुरुषांसाठी स्वच्छतागृह बांधलेले आहे.

परंतु दोन्ही स्वच्छतागृहांचे दरवाजे एकमेकांना लागूनच असल्यामुळे बऱ्याच वेळेस पुरुष हे महिलांच्या स्वच्छतागृहात घुसतात तर कधीकधी महिलाही चुकून पुरुषांच्या स्वच्छतागृहात प्रवेश करतात. साडेतीन कोटीच्या बसस्थानकात जाफ्राबाद आगार व चिखली आगारातील काही चालक फलाटावर गाड्या व्यवस्थित लावणे तर सोडाच साधी एन्ट्री करण्यासाठीही नियंत्रण कक्षात येत नाही. चिखली आगाराचे आगारप्रमुख व जाफ्राबाद आगाराचे आगारप्रमुख यांच्याशी बऱ्याच वेळेस याबाबत बोलणे झाले. परंतु त्यांनी अद्यापही आपापल्या आगारातील चालकांना कोणतीही लेखी सूचना दिल्या नाही. बसचालकांच्या हेकेखोरपणामुळे दुर्दैवाने एखादा अपघात घडू शकतो. त्यामुळे बस स्थानकात प्रवाशांसाठी वरील सुविधा तात्काळ देण्यात याव्यात. अन्यथा येत्या आठ दिवसात कोणतीही पूर्वसूचना न देता परिवहन महामंडळाच्या कार्यप्रणालीच्या निषेधार्थ लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल.

असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे, सचिव जहीर पठाण, शहराध्यक्ष विजय खांडेभराड, आजमत खान,शंकर वाघमारे, कार्याध्यक्ष जना मगर, असलम खान, साजिद खान, राजू गव्हाणे आदींनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये