ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरद जोशींच्या विचाराने स्वयंसिध्दा सीता पुरस्काराचे आयोजन

व्यवस्थेविरूद्ध लढून समाजाला दिशादर्शक व आदर्श मातांचा सत्कार प्रेरणादायी - ॲड. वामनराव चटप

चांदा ब्लास्ट

   प्रस्थापित पुरूषप्रधान समाजव्यवस्था, घरचा कमावता व्यक्ती निघून गेल्याने कोसळलेला दुखा:चा डोंगर, पाठीमागे मुलांची जबाबदारी अशी अनेक आव्हाने लिलया पेलून त्यासाठी आपली नितीमत्ता ढळू न देता या स्पर्धेच्या युगात आपली मुले केवळ मोठीच केली नाही तर त्यांना उच्चशिक्षित करून संस्कारक्षम बनवून समाजापुढे मोठा आदर्श निर्माण केला अशा आदर्श मातांचा सर्व महिलांनी आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन शेतकरी संघटनेचे जेष्ठ नेते माजी आमदार ॲड.वामनराव चटप यांनी केले.

         देशातील एकमेव सीतामातेचे मंदिर असलेल्या यवतमाळ जिल्ह्यातील रावेरी येथे सीतानवमी निमीत्त आयोजित स्वयंसिध्दा सीता पुरस्कार वितरण सोहळ्यात अध्यक्षस्थानाहून ॲड.वामनराव चटप बोलत होते. कार्यक्रमाचे उदघाटन ॲड. दिनेश शर्मा यांनी केले. प्रमुख अतिथी शेतकरी संघटनेचे ललित बहाळे, शेतकरी महिला आघाडीच्या अध्यक्षा प्रज्ञाताई बापट, शैलाताई देशपांडे,  स्वभाप प्रदेशाध्यक्ष मधुसूदन हरणे, सतीश दाणी, रावेरीचे सरपंच राजेंद्र तेलंगे, यवतमाळ जिल्हा बँक संचालीका वर्षा तेलंगे, संदीप तेलंगे, विनोद काकडे, महेश सोनेकार, राजेंद्र झोटींग, चंद्रकांत देशमुख, नंदू काळे, वामन जाधव, विजय निवल, अरूण केदार, मुकेश मासुरकर, सुधा पावडे, गजानन झोटींग उपस्थित होते. यावेळी बोलतांना ललीत बहाळे यांनी महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी शरद जोशींनी सांगितलेला चतुरंग शेतीचा कार्यक्रम अंमलात आणावा, असे आवाहन केले. प्रज्ञाताई बापट यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.

           या सोहळ्यात सीतेप्रमाणे संघर्ष करून आपल्या पाल्यांना लवकुशांप्रमाणे पायावर उभे करून आत्मनिर्भर, समाजातील प्रतिष्ठित व सन्माननीय नागरिक घडवले, अशा चंद्रपूर जिल्यातील नंदा शालिक बुरडकर, विठाबाई बाजीराव मुन, छाया निर्दोष पिदुरकर व लता मनोहर ढवस, वर्धा जिल्यातील राधा जसराज केला व यवतमाळ जिल्ह्यातील पुष्पा मोहन काकडे या सहा कर्तबगार महिलांचा शाल, श्रीफळ, साडी, स्मृतीचिन्ह, मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वयंसिद्धा सीता पुरस्काराने भावपूर्ण सत्कार करून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

           शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांनी स्वखर्चाने देशातील एकमेव असलेल्या सीतामंदिराचा जीर्णोध्दार करून येथे महिला सन्मान व त्यांच्या माहेरची प्रचिती देण्याचा स्त्युत्य सोहळा सुरू केला. आता भव्य प्रमाणात सीतानवमीला हा सोहळा संपन्न होतो. या सोहळ्यात आत्मनिर्भरता व आत्मसन्मानासाठी महिला सक्षमीकरण, शेतकरी महिला आघाडीची भुमिका याविषयी वैचारिक विचारमंथन झाले. कार्यक्रमात उपस्थित सत्कारमुर्ती महिला भारावून गेल्या तर काहींना आपण केलेल्या कार्याची पावती मिळाल्याबदद्ल आनंदाश्रू अनावर झाले.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक शैलाताई देशपांडे व आभारप्रदर्शन मधुसूदन हरणे यांनी केले. संचालन प्रा. लीना शेंडे यांनी केले. या सोहळ्याला महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी अमृता वल्लभवार, जोत्स्ना अमृतकर, सारंग दरणे, गणेश मुटे, खुशाल हिवरकर, नामदेव काकडे, मुकेश धाडवे, छोटू काकडे, महिला बचत गट यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये