Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

घारपना येथील जलजीवन योजनेचे काम कासवगतीने

दिड महिन्यापासूनच कंत्राटदार नाही आणि कामही ठप्प ; कंत्राटदार व प्रशासनावर नागरिकांचा तीव्र रोष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

गावातील पाणी टंचाई कायमची दूर करून घरा-घरात शुद्ध व स्वच्छ पाणी पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून जलजीवन मिशन योजना राबविली जात आहे. मात्र कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षितपणामुळे घारपना येथील मागील दिड महिन्यांपासून जलजीवन योजनेचे कामे बंद आहेत, विहिरीचे काम अपूर्ण आहे,गावात पाईपलाईन केली नाही.फक्त पाण्याची टाकी उंच भागावर उभारली आहे त्याचेही काम पूर्ण झाले नाही, अवकाळी पावसामुळे टाकीत पाणी साचले असून आताच ती गळायला लागल्याने कामाच्या गुणवत्तेवर शंका निर्माण झाली असून संबंधित कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कठोर कार्यवाही करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

        कोदेपूर ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या घारपना(मराठागुडा) व घारपना(गोंडगुडा) हे दोन्ही गुडे जवळ-जवळ आहेत, दोन्ही गुड्यासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा करणारी योजना हवी होती परंतु येथील लोकांना किंवा ग्रामपंचायतीला संबंधित विभागाने विश्वासात न घेता फक्त एकच विहिरीचे अंदाजपत्रक तयार केले.अजूनही विहिरीचे काम करण्यात आले नाही, गावातील जुन्याच विहिराला आडवे बोअरवेल मारुन पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे बोलले जात आहे मात्र घारपना( गोंडगुडा) येथील आदिवासी बांधवांना हे मान्य नाही.त्यांनी स्वतंत्र विहिरीची व पाण्याच्या टाकीची मागणी घेऊन ठाम आहेत.योजना आखताना संबंधित विभागाने येथील दोन्ही गुड्यातील नागरीकांना विश्वासात घेऊन योजनेची आखणी करायला पाहिजे होती परंतु तसे झाले नाही.मंजूर असलेली कामेही कंत्राटदारांने पुर्णत्वास नेली नाही,विहिरीचे काम अपूर्ण आहे,पाइपलाइन झाली नाही,फक्त शेतातून पाण्याच्या टाकीपर्यंत पाइपलाइन साठी खोदकाम केले आहे, मात्र पाइप टाकून नाली बुजावण्यात आली नाही,बांधकाम झालेल्या पाण्याच्या टाकीवर कधी पाणी टाकले नाही, अपूर्ण असलेल्या टाकीतून आताच पाणी गळायला लागले आहे.त्यामुळे हि टाकी अधिक काळ टिकेल की नाही यावर शंका असली तरी संबंधित अधिकारी या जलजीवन मिशन योजनेच्या कामावर फिरकले नाही. अधिकाऱ्यांच्या गैरहजेरीत ही कामे होत असल्याने कंत्राटदार थातूरमातूर कामे करून मोकळे होण्याच्या तयारीत आहेत.

        विशेष म्हणजे हि कामे सुरू करण्याअगोदर गावात संबंधित योजनेचे अंदाजपत्रक फलक लावणे महत्त्वाचे आहे. मात्र फलक कुठेही लावण्यात आले नाही.त्यामुळे या महत्वाकांक्षी योजनेतून गावात कुठली कामे होणार आहेत आणि त्यावर किती शासन निधी खर्च होणार आहे याची साधी भनकही गावकऱ्यांना नाही.पावसाळा अगदी तोंडावर आला आहे परंतु कंत्राटदाराचे कामाकडे विशेष लक्ष नाही.पावसाळ्यापूर्वी हि संपूर्ण कामे पुर्ण व्हायला हवी आहे परंतु अधिकारी आणि कंत्राटदाराच्या लापरवाहीमुळे हि कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण होण्याची गॅरंटी दिसत नाही.त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देऊन कामे बंद करून गायब झालेल्या कंत्राटदारांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

  ग्रामीण भागातील नागरिकांना आणि दुर्बल भागाला पाणी मिळावे म्हणून सरकारने जलजीवन मिशन योजना सुरु केली आहे. मात्र या योजनेचे काम मागील दीड महिन्यापासून रखडले आहे. यामुळे नागरिकांना आणि महिलांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत असल्याचे चित्र आहे. सरकारने या योजनेसाठी लाखो रुपये खर्च केले आहेत. तरी देखील योजना अद्यापही रखडली आहे.

-डिगांबर इंद्राळे, नागरिक घारपना

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये