ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आसन खुर्द येथे गिट्टी भरलेला हायवा भस्मसात.!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

 गिट्टी भरलेल्या हायवाच्या मागील टायरने अचानक पेट घेतला आणि अर्ध्या तासात वाहन भस्मसात झाले. यवतमाळ जिल्ह्यातील मोहदा येथून कोरपना मार्गे गिट्टी भरून येत असताना हायवाच्या टायरने पेट घेतल्याने हायवाला भीषण आग लागली. ही घटना राजुरा – कोरपना राष्ट्रीय महामार्गावरील आसन खुर्द जवळ सोमवारी सकाळी सव्वाआठच्या सुमाराला घडली. राजुरा – गोविंदपूर राज्य सीमा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ बी चे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे.

या कामासाठी महामार्ग निर्मितीचे काम असलेल्या जीआर कंपनीद्वारे मोहदा येथून गिटी आणली जात आहे. तिथून येत असताना अचानक मागील टायरने पेट घेतला. याबाबत रस्त्याने जाणाऱ्या नागरिकांनी ड्रायव्हरला कल्पना दिली. तो वाहनतून खाली उतरला. मात्र त्याच्या वाहनात कुठलेही अग्निशामक साहित्य नसल्याने त्याचाही नाईलाज झाला. मार्गाच्या कामाला असलेल्या पाणी टँकरमधून पाईप लावून आग विझविण्याचा प्रयत्न तेथील मजुरांनी केला. घटनेच्या अर्धा तासानंतर गडचांदूर नगर पालिका व अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचे अग्निशमन वाहन पोहोचले. त्यामुळे आग आटोक्यात आली. तोवर HR 58 C6240 क्रमांकाचे GR कंपनीचे हे वाहन भस्मसात झाले होते.

या राष्ट्रीय महामार्गावरील ही घटना बघण्यासाठी बोरी नवेगाव तसेच आसन खुर्द येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यात पोलीस पाटील प्रफुल्ल सिडाम, आरती गेडाम यांचाही समावेश होता. गडचांदूर पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. सोळा टायर हायवाला प्राप्त परवानगी पेक्षा बरेच अधिक लोड वाहनात असल्यामुळे ट्रकचे टायर पेटल्याचे जाणकार व प्रत्यक्षदर्शी यांचे म्हणणे आहे.

सामान्य जनतेची लहानसहान वाहने थांबवून कारवाईचा बडगा उगारणाऱ्या पोलीस प्रशासनाची तमा न बाळगता मोठ्या कंपन्या सर्रास ओव्हरलोड वाहने चालवत असल्याबद्दल उपस्थित नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये