ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रम्हपुरी शहरात डासांचा प्रादुर्भाव

नगर परिषद आरोग्य विभाग कोमात ; नगर परिषदेचे आरोग्य सभापती लक्ष देतील का?

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदु गुद्देवार

ब्रम्हपुरी :- ब्रम्हपुरी शहरात डासांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे परंतु ब्रम्हपुरी नगर परिषदेचे आरोग्य विभाग कोमात गेले असून नागरिकांना डास पळविण्यासाठी अगरबत्ती व कॉईल्सचा वापर वाढल्याने नागरिकांना आर्थिक झळ सोसावी लागत आहे. त्याचा दुष्परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.सांडपाणी वाहुन जाण्यासाठी गावांमध्ये बांधण्यात आलेल्या नाल्या बहुतांश ठिकाणी गाळांनी तुंडूब भरल्या आहेत. या कारणाने डासांची उत्त्पत्ती झपाट्याने होत आहे.

सायंकाळच्या वेळी घरातील मंडळीना डास निवांत बसु देत नाही. यामुळे फॅनचा आसरा घ्यावा लागत आहे. विजेची बचत करण्याचा मानस असला तरी डास चावल्यास हिवताप होऊ नये म्हणून विजेचा वापर करावाच लागत आहे. डास घरातून पळविण्यासाठी अगरबत्त्या वापराव्या लागत आहे. डासाचे प्रमाण वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. असे असतानाही नगरपरिषद आरोग्य विभागाचे याकडे फारसे लक्ष दिसत नसल्याची तक्रार नागरिक करीत आहे. धुरळणी साठी असणाऱ्या फॉगिंग मशीनची बहुतांश नगर परिषदांनी खरेदी केली असली तरी त्या मशिनी नादुरुस्त असल्याचे सांगण्यात येते. डी. डी. टी. ची फवारणी कालबाह्य झाली आहे.

त्यामुळे थंडी वाजून ताप येण्याच्या रुग्णांची गर्दी खासगी रुग्णालयांमध्ये वाढत आहे. अनेक प्रकारच्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ग्रामीण रुगणालयातील बाह्यरुग्ण विभागातही गर्दी दिसून येत आहे. डासाचा बंदोबस्त करण्यासाठी ब्रम्हपुरी नगर परिषदेने फोगिंग मशीनने फवारणी करणे गरजेचे आहे. परंतु नगर परिषदेचे ४ फोगींग मशीन ह्या धुळ खात आहेत त्यामुळे फवारणी होत नसल्याने व नाल्यांची सफाई नियमित होत नसल्याने आजाराची शक्यता बळावली आहे. स्थानिक नगर प्रशासनाने या बाबीची गंभीर दखल घेण्याची मागणी होत आहे.

प्रत्येक प्रभागात नित्याने फवारणी, धुरळणी करणे गरजेचे आहे. मात्र, जनसामान्यांनी निवडून दिलेले जनप्रतिनीधी सर्वसामान्यांच्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.नगरपरिषदेचे प्रशासकीय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी जनसामान्यांच्या समस्यांकडे लक्ष देतील काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये