ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एप्रिल, मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता

उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना करा - जिल्हाधिकाऱ्यांचे संबंधित यंत्रणेला निर्देश

चांदा ब्लास्ट

जिल्ह्यात उन्हाचा पारा चांगलाच चढला असून गत आठवड्यापासून जिल्ह्याचे तापमान ४० अंशाच्या वर आहे. तसेच एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी संबंधित यंत्रणेने आतापासूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिले.

उष्मालाटेच्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची आढावा बैठक बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अपर पोलिस अधिक्षक रिना जनबंधू, निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, मनपा आयुक्त विपील पालीवाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. महादेव चिंचोळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटारे, प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांच्यासह इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी १९ एप्रिल रोजी भर उन्हात आपल्याकडे मतदान होणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, मतदान केंद्रावर अधिकारी व कर्मचा-यांसाठी आरोग्य विभागाने ओ.आर.एस. पॅकेटचा पुरवठा करावा. जेणेकरून एखाद्याला आवश्यकता भासली त्वरीत देणे शक्य होईल. तसेच स्थानिक प्रशासनाने प्रत्येक मतदान केंद्रावर पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था करावी. मतदानासाठी जाणारे अधिकारी – कर्मचारी आणि पोलिस कर्मचा-यांनासुध्दा उष्माघात टाळण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत पुरेशी माहिती द्यावी. तसेच उन्हापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी स्वतःची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी गौडा यांनी केले.

विविध विभागांनी करावयाच्या उपाययोजना :

आरोग्य विभागाने प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात व रुग्णालयांमध्ये कुल वॉर्ड तयार करावे. उष्माघात बाधित व्यक्तीच्या उपचारासाठी औषधाचा मुबलक साठा उपलब्ध ठेवावा. सर्व दवाखाने/इमारतींचे आग सुरक्षा परिक्षण करून घ्यावे. आय.व्ही फ्लूईड, आईस पॅक व ओआरएस उपलब्ध करून ठेवावे. जिल्हा उद्योग केंद्राने भट्टीशी संबंधित कारखाने / व्यवसायामध्ये काम करणा-या कामगारांच्या कामाचे नियोजन व नियमन करण्यासाठी संबंधितांना सुचना द्याव्यात. शिक्षणाधिकारी (प्राथ/माध्य) यांनी शाळांचे वेळापत्रक सकाळच्या सत्रात करून घेणे तसच शाळांमध्ये पिण्याचे पाणी, पंखे, प्रथमोपचार इत्यादी प्राथमिक सुविधा उपलब्ध राहतील, याची खात्री करावी.

उपजिल्हाधिकारी (रोहयो) यांनी मनरेगा / नरेगा अंतर्गत मजुरांना दुपारच्या सत्रात विश्रांती देऊन त्यांच्या सोयीनुसार सकाळ अथवा संध्याकाळच्या सत्रात कामे वाटून देणे. वन विभागाने वन्यप्राण्यांसाठी पाणतळे निर्माण करणे, वनवा प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सर्व बाजार समित्या, सहकारी कारखाने, सहकारी संस्था, आदी ठिकाणी पाण्याची व प्राथमिक सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने ग्रामीण व शहरी भागात पुरेसा व स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल, याची दक्षता घ्यावी.

उष्माघात टाळण्यासाठी नागरिकांनी काय करावे :

तहान लागली नसली तरी सुद्धा जास्तीत जास्त पाणी प्यावे. हलकी, पातळ व सछिद्र सुती कपडे वापरावे. बाहेर जाताना गॉगल, छत्री, टोपी, बूट व चप्पलचा वापर करावा. प्रवास करताना पाण्याची बाटली सोबत न्यावी. उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तींनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करावा. तसेच ओल्या कपड्यांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा. शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओ.आर. एस., घरी बनवलेली लस्सी, तोरणी, लिंबू पाणी, ताक इत्यादीचा वापर करावा.

अशक्तपणा, स्थूलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा चटका बसण्याची चिन्हे ओळखावी व चक्कर येत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पाणी द्यावे. घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा, तसेच रात्री खिडक्या उघड्या ठेवाव्यात. पंखे, ओले कपडे याचा वापर करण्यात यावा. तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करावे. कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. सूर्यप्रकाशाचा थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सूचित करावे. पहाटेच्या वेळी जास्त जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा. बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये ब्रेक घेऊन नियमित आराम करावा. गरोदर स्त्रिया आणि आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी. रस्त्याच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावे. जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी.

काय करू नये :

 लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेले व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी १२ ते ३.३० या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालू नये. बाहेरील तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावी व उन्हात अतिकष्टाची कामे करू नये. उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळावे. तसेच मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवण्यात यावी. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेट थंड पेय घेऊ नये.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये