ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वरोरा येथे महसूल सप्ताह सोहळा उत्साहात संपन्न

विविध योजनांचे लाभ व माहिती जनतेपर्यंत पोहचविण्याचा निर्धार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेंद्र मर्दाने 

वरोरा : ‘जनसेवेसाठी समर्पित वाटचाल ‘ हे ब्रीद घेऊन ‘महसूल सप्ताह – २०२५ समारोप सोहळा’ स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. अध्यक्षस्थानी आमदार करण देवतळे होते. या कार्यक्रमाला वरोरा उपविभागीय अधिकारी अमर राऊत (भा.प्र.से.), तहसीलदार योगेश कौटकर, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, तालुका कृषी अधिकारी रवि राठोड, बाल विकास प्रकल्प अधिकारी शरद पारखी, उप अधीक्षक भूमी अभिलेख मिलिंद राऊत, सहा. पोलीस निरीक्षक अनिल मेश्राम, कृषी अधिकारी बोरकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते.

युवा आमदार व अधिकारी यांच्या ऊर्जेमुळे कामाला गती मिळेल. – आमदार देवतळे

       आपल्या अध्यक्षीय भाषणात आमदार करण देवतळे म्हणाले की, तालुक्यात आमदार, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गट विकास अधिकारी, कृषी अधिकारी व अन्य विभागातील अधिकारी हे सर्व युवा असून त्यांच्या उर्जेमुळे कामाला गती येईल. वरोरा – भद्रावती मतदारसंघातील जनतेचे प्रश्न प्राधान्याने सोडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तहसील कार्यालयात ‘एक खिडकी योजना’ सारखे कक्ष सुरू झाल्यात नागरिकांच्या अनेक समस्या तत्काळ मार्गी लागतील, असे त्यांनी सांगितले.

शासनाच्या विविध योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे – उपविभागीय अधिकारी- अमर राऊत

“महसूल दिन/ सप्ताह” साजरा करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे शासन व जनतेतील अंतर कमी करणे. शासनाच्या विविध योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचल्या पाहिजे. ज्यामुळे लोकांचा शासनावर विश्वास अधिक दृढ होईल. ते पुढे म्हणाले की, महसूल अंतर्गत येणारे सर्व विभाग वेगवेगळे काम करतात, मात्र महसूल सप्ताहाच्या माध्यमातून सर्वांना मैत्रीपूर्ण वातावरणात एकत्र येऊन काम करण्याची संधी मिळते. त्यामुळे त्याचा उत्साह द्विगुणित होतो. कामात पारदर्शकता, आढावा व उजळणी ही सतत सुरू राहिली पाहिजे, तसेच हा उत्साह फक्त एका आठवड्यासाठी मर्यादित ठेवता वर्षभर कायम ठेवला पाहिजे, असे ही त्यांनी नमूद केले.

 सांगता समारोह नव्हे तर नवीन कार्याचा शुभारंभ – तहसीलदार कौटकर

     आपल्या संबोधनात तहसीलदार योगेश कौटकर यांनी महसूल सप्ताह अंतर्गत राबविण्यात आलेल्या योजनांची व उपक्रमाची सविस्तर माहिती देतांना सांगितले की, महसूल सप्ताह १८६ गावात राबविण्यात आला.याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शासकीय जागेवर सन २०११ पूर्वीपासून रहिवासी प्रयोजनार्थ अतिक्रमण असलेल्या कुटुंबापैकी अतिक्रमण नियमानुकुल करण्यास पात्र असलेल्या ८२ कुटुंबांना सदर अतिक्रमित जागेचे पट्टे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत वीज पडून मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तिच्या वारसांना, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना शासकीय नियमानुसार देय असलेले मदतीचे धनादेश वाटप करण्याची कार्यवाही, मंडळ स्तरावर पांदण/ शिव रस्त्याच्या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी पांदन रस्ते मोजणी करून दुतर्फा वृक्ष लागवड करण्यात आली. विशेष सहाय्य योजनेतील डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम राबवून कार्यवाही करण्यात आली. “महसूल दिन” हा १ ऑगस्ट रोजी साजरा करण्यात येतो. त्यामुळे हा सांगता समारोह नव्हे तर नवीन कार्याचा शुभारंभ असल्याचे मत कौटकर यांनी व्यक्त केले.

        यावेळी विविध मान्यवरांनी आपले विचार मांडले. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनाबद्दल समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमात विविध विभागांमार्फत माहितीपर स्टॉल लावण्यात आले होते.

     सुरुवातीला मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

     कार्यक्रमात आमदार देवतळे, उपविभागीय अधिकारी राऊत व मान्यवरांच्या हस्ते विविध लाभ वितरित करण्यात आले. यात वारस पट्टे, धनादेश, अंत्योदय शिधा पत्रिका, सनद वितरण आदींचा समावेश होता. मान्यवरांच्या हस्ते राजस्व विभागातील सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला.

     कार्यक्रमात नायब तहसीलदार गिरीश बोरडे, उल्हास लोखंडे, शरद मसराम सहा. राजस्व अधिकारी अमोल आखाडे, सामाजिक कार्यकर्ते व न.प. माजी सभापती छोटूभाई शेख,अक्षय भिवदरे, माजी नगरसेवक व पत्रकार राजेंद्र मर्दाने,बाळू भोयर, प्रवीण गंधारे, सहा.महसूल अधिकारी, मंडळ अधिकारी, महसूल सहायक, ग्राम महसूल अधिकारी, कोतवाल, आदींची उपस्थिती होती.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मंदा हेपट यांनी तर आभार प्रदर्शन तहसीलदार योगेश कौटकर यांनी केले. कार्यक्रमात मोठ्या संख्येने शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी परिसरातील शेतकरी, महिला व गणमान्य नागरिकांची लक्षणीय उपस्थिती होती.

    उपजिल्हा रुग्णालयातील सहा.अधिसेविका वंदना बरडे यांनी अवयवदानाची शपथ देऊन समारोहाची सांगता केली.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये