ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजीपाला विकणाऱ्या महेशचे खाकी वर्दीचे स्वप्न पूर्ण

अविरत संघर्षातून चंद्रपूर पोलिसात निवड  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

“परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळविता येते,” हे विठ्ठलवाडा येथील महेश कमल रमेश शेंडे या युवकाने आपल्या संघर्षमय प्रवासातून सिद्ध करून दाखवले आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातील महेशची नुकतीच चंद्रपूर पोलिस दलात निवड झाली असून, त्याच्या या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

महेशचे प्राथमिक शिक्षण गावातीलच जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडा येथे झाले. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून पदवी शिक्षण सुरू असतानाच स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासास सुरवात केली. दरम्यान अचानक वडिलांचे निधन झाले आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातील कर्ता पुरुष गेल्यानंतर संसाराचा संपूर्ण भार आईच्या खांद्यावर आला.

मुलांनी शिकून मोठं व्हावं, चांगली नोकरी मिळवावी, एवढंच स्वप्न आई (कमल)ने डोळ्यांत साठवून ठेवलं होतं. त्यासाठी तिने भाजीपाला विकून संसाराचा गाडा चालवला. उन्हाची तीव्रता, पावसाच्या सरी, वादळाचा तडाखा… कोणत्याही परिस्थितीत ती बाजारात उभी राहायची. मुलांच्या शिक्षणासाठी तिने अहोरात्र कष्ट उपसले. आईच्या या संघर्षात महेशही तिच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला.

शुक्रवारी आष्टी, शनिवारी भंगाराम तळोधी, रविवारी गोंडपिपरी, मंगळवारी पोंभूर्णा आणि बुधवारी धाबा बाजारात तो भाजीपाला विकायचा. “३० रुपये किलो टमाटर… २० रुपये पाव मिरची…” अशी हाक देत दिवसभर बाजारात भाजीपाला विकणे आणि रात्री उशिरा घरी परतणे, हा त्याच्या आयुष्याचा भाग बनला होता.

दिवसभराच्या थकव्यानंतरही त्याने अभ्यास कधीच सोडला नाही. पहाटे पाच वाजता उठून धावण्याचा सराव, अर्धा तास वर्तमानपत्र वाचन, त्यानंतर पोलिस भरतीचा अभ्यास, दिवसभर बाजारातील काम आणि रात्री पुन्हा अभ्यास असा त्याचा शिस्तबद्ध दिनक्रम होता. २०११ पासून त्याने स्पर्धा परीक्षेच्या प्रवासाला सुरुवात केली. अनेक वेळा अपयश आले, आर्थिक अडचणी आल्या, मानसिक ताण सहन करावा लागला; मात्र त्याने जिद्द सोडली नाही.

ग्रामीण भागात सुविधा मर्यादित असतानाही महेशने स्वतःच्या मेहनतीवर विश्वास ठेवला. पोलिस भरतीसाठी आवश्यक शारीरिक तयारी आणि लेखी परीक्षेची तयारी त्याने सातत्याने केली. कठीण परिस्थितीतही अभ्यासात खंड पडू दिला नाही. “आज नाही तर उद्या यश मिळणारच,” हा विश्वास त्याने कायम जपला. अखेर २०२६ मध्ये त्याच्या संघर्षाला यशाची किनार मिळाली आणि चंद्रपूर पोलिस दलात त्याची निवड झाली.

महेशच्या यशाचे खरे गमक म्हणजे सातत्य, शिस्त, आणि परिस्थितीसमोर न हार मानण्याची वृत्ती. महागडे क्लासेस नव्हते, अभ्यासासाठी स्वतंत्र खोली नव्हती, आर्थिक पाठबळ नव्हते; पण मेहनतीची तयारी आणि स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द होती. त्याच जोरावर त्याने संघर्षाला यशात बदलले.

आज महेशचे यश हे केवळ एका युवकाचे यश राहिलेले नाही; तर आईच्या घामाचे, त्यागाचे आणि संघर्षाचे फळ ठरले आहे. विठ्ठलवाडा परिसरातील अनेक युवक आज त्याच्याकडे प्रेरणेने पाहत आहेत. मोबाईल, व्यसन आणि नैराश्याच्या आहारी न जाता ध्येय निश्चित करून सातत्याने मेहनत घेतली तर यश निश्चित मिळते, हा संदेश महेशच्या संघर्षमय प्रवासातून समाजासमोर आला आहे.

परिस्थितीवर रडत बसण्याऐवजी संघर्षाशी दोन हात करणाऱ्या महेशने “मेहनतीपुढे परिस्थितीही हार मानते,” हे आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये