ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा तालुक्यात तीव्र पाणीटंचाई

उपायोजना करा अन्यथा घागर मोर्चा काढू ; राष्ट्रवादीचा इशारा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

        तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये पाण्याचे स्रोत आटले असून पाण्यासाठी ग्रामस्थांवर विशेषता महिलांवर वणवण भटकण्याची वेळ आली आहे. ग्रामीण भागात अनेक गावातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासह पशुधनांच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी विहीरी अधिग्रहण करून शासनामार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा, अन्यथा घागर मोर्चा काढू अशी मागणी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे.

      राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वतीने दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, देऊळगाव राजा तालुक्यामध्ये ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये दुष्काळी परिस्थिती असून नागरिकांच्या व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात आहे. बऱ्याच गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची स्रोत आटले असून पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी ग्रामस्थांना विशेषता महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तालुक्यातील दिग्रस सारख्या गावांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

मागील एक ते दोन महिन्यांपासून या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. परिणामी येथील नागरिकांवर टँकरद्वारे विकत पाणी घेण्याची वेळ आली आहे. अशा गावातील जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर झाला आहे. मात्र अद्यापही शासनाद्वारे पिण्याच्या पाण्यासाठी उपयोजना करण्यात आलेल्या नाही. तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये टँकरने पाणीपुरवठा करण्याची गरज असून पाणीपुरवठा करण्यासाठी संबंधित प्रशासनाला योग्य त्या सूचना द्याव्यात. ग्रामीण भागात तात्काळ टँकर मंजूर करून व विहिरी अधिग्रहण करून नागरिकांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सोडवावा, अन्यथा पंचायत समिती कार्यालयावर घागर मोर्चा काढण्यात येईल,

असा इशारा राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष राजेश इंगळे,तालुका सचिव जहीर पठाण,शहराध्यक्ष विजय खांडेभराड, अजमत खान,शंकर वाघमारे, मुबारक चाऊस,अमोल उदयपूरकर, सचिन कोल्हे,साजिद खान, असलम खान आदींनी दिला आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये